बीड: लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात प्रतिष्ठेचा मतदारसंघ म्हणून पाहिल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. बारामती लोकसभेसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. तत्पूर्वी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामती मतदारसंघात तीन सभा घेतल्या. प्रकृती साथ देत नसतानाही शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांना ऐकण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना आणि लोकांना नाराज केले नाही. मात्र, बारामतीमधील शेवटची सभा संपेपर्यंत शरद पवार यांची प्रकृती बरीच बिघडली होती. घसा बसल्यामुळे त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड थकवाही जाणवत होता. 


परिणामी शरद पवार यांचे सोमवारी नियोजित असलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शरद पवार गटाकडून रविवारी रात्री याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचारासाठी सोमवारी नियोजित असलेले शरद पवार यांचे सर्व सभा आणि कार्यक्रम रद्द झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बीड लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. साहेब तुम्ही फक्त तब्येतीला जपा, आम्ही लढून विजय तुमच्या पायाशी आणून ठेवतो, असे सोनावणे यांनी म्हटले आहे. 


लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून शरद पवार हे राज्यभरात विविध ठिकाणी सभा घेत फिरत आहेत. बारामतीच्या सभेत बोलताना त्यांनी सांगितले की, मी किमान 40 सभा घेऊन आलो आहे. या सततच्या दगदगीचा परिणाम तब्येतीवर होत असतो. साहजिकच या सगळ्याचा परिणाम गळ्यावर होतो. त्यामुळे मी आज या स्थितीत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. 


बजरंग सोनावणे यांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? 


साहेब, तब्येतीला जपा!


तब्येतीच्या कारणास्तव उद्या माझ्या प्रचारार्थ आयोजित आष्टीतील सभेला आपण येणार नाही, हे समजलं आणि साताऱ्याच्या सभेची आठवण झाली. तेव्हा तुम्ही पावसाला थांबू शकला नव्हतात, पण तेव्हा पाऊसही तुम्हाला थांबू शकला नाही..


तुमची तब्येत खराब झाल्याचे कळले. मागील पाच-सहा दशके अशा निवडणुका कित्येक बघितल्या असतील तुम्ही. तुमच्या नावावरच झाल्या त्या! मागील कित्येक दशके महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीला अभिमानानं आव्हान देतो. पण साहेब, आता आमचं ऐका! आता ही खिंड आम्हालाच लढू द्या. तुम्ही फक्त आणि फक्त तब्येतीला जपा.


लढणं, तेही विपरीत परिस्थितीत, तुम्ही या देशाला दाखवून दिलंय. विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो! आता पुढची जबाबदारी आमची. ही निवडणूक आता शरद पवारांचे कार्यकर्ते म्हणूनच लढू द्या! साहेब फक्त प्रकृतीची काळजी घ्या. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही हा इतिहास आहे. तो इतिहास आम्ही जपू, तुम्ही फक्त, तब्येतीला जपा साहेब. आणि तुमचा आशीर्वाद पाठीशी राहुद्या.


~ तुमचा, 
बजरंग बप्पा!




आणखी वाचा


रणरणतं ऊन, शरीरात थकवा; आवाज बसलेला.... तरी 85 वर्षाच्या योद्ध्याच्या लेकीसाठी सभा; शरद पवारांनी बारामती गाजवली