मुंबई : भाजप (BJP) गूगल (Google) आणि व्हिडीओ प्लॅटफॉर्म युट्यूब (YouTube) वरील जाहिरातींसाठी (Advertisement) 100 कोटी रुपये खर्च करणारा पहिला पक्ष ठरला आहे. गूगल आणि युट्यूबवर राजकीय जाहिरातींसाठी 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणारा भाजप हा भारतातील पहिला राजकीय पक्ष ठरला आहे. मे 2018 पासून भाजपच्या डिजिटल प्रचार मोहिमेसाठी 101 कोटींहून अधिक रक्कम खर्च केली आहे. भाजपने डिजिटल प्रचारासाठी खर्च केलेली रक्कम ही काँग्रेस, द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) आणि राजकीय सल्लागार संस्था इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी (I-PAC) यांनी एकत्रितपणे खर्च केलेल्या रकमेइतकी आहे. गूगलच्या जाहिराती पारदर्शकता अहवालात ही माहिती समोर आली आहे.
भाजपकडून गूगल जाहिरातींसाठी सर्वाधिक खर्च
एका वृत्तसंस्थेच्या विश्लेषणानुसार, 31 मे 2018 आणि 25 एप्रिल 2024 दरम्यान प्रकाशित झालेल्या Google जाहिरातींमध्ये भाजपचा वाटा, एकूण खर्चाच्या सुमारे 26 टक्के म्हणजेच 390 कोटी रुपये आहे. भाजपची जाहिरात राजकीय जाहिरात म्हणून वर्गीकृतवर केली जाते. गूगलने राजकीय जाहिराती म्हणून वर्णन केलेल्या एकूण 217,992 एकूण कंटेंटमध्ये 73 टक्के वाटा हा भाजपचा आहे. यामध्ये भाजपने 161,000 हून अधिक जाहिरात कंटेट प्रकाशित केला आहे.
भाजप जाहिरातींसाठी 100 कोटी खर्च करणारा पहिला पक्ष
भाजपच्या जाहिरातींसाठी कर्नाटकमध्ये 10.8 कोटी रुपये, त्यानंतर उत्तर प्रदेशात 10.3 कोटी रुपये, राजस्थानमध्ये 8.5 कोटी आणि दिल्लीत 7.6 कोटी रुपये खर्च केले आहेत. एकंदरीत, गूगल जाहिरातींमध्ये भाजपसह सर्व राजकीय पक्षांचे जाहिरातींचे सर्वाधिक लक्ष्य तामिळनाडू होते, त्यानंतर तेलंगणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये डिजिटल जाहिरातीचं प्रमाण जास्त पाहायला मिळालं.
काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, 45 कोटी खर्च
अहवालानुसार, गूगल जाहिराती आणि गूगल डिस्प्ले आणि व्हिडीओ 360 वर राजकीय जाहिरांतीवरील खर्चाच्या बाबतीत काँग्रेस 45 कोटी रुपयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेस पक्षाने या कालावधीत 5992 ऑनलाइन जाहिराती प्रकाशित केल्या, ज्याचे प्रमाण भाजपने प्रकाशित केलेल्या जाहिरातींच्या फक्त 3.7 टक्के आहेत. काँग्रेसची जाहिरात मोहीम प्रामुख्याने कर्नाटक आणि तेलंगणा येथे होती, जिथे प्रत्येकी 9.6 कोटी रुपये खर्च करण्यात आला. त्यानंतर मध्य प्रदेश 6.3 कोटी रुपये जाहिरातींवर खर्च करण्यात आले.
Google, YouTube Ads चा अहवाल
तमिळनाडूचा सत्ताधारी पक्ष, द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) गूगल प्लॅटफॉर्मवर तिसरा सर्वात मोठा राजकीय जाहिरातदार पक्ष आहे. द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षाने मे 2018 पासून गूगल जाहिरातींसाठी 42 कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये या वर्षीच्या फेब्रुवारीपासून राजकीय सल्लागार कंपनी पॉप्युलस एम्पॉवरमेंट नेटवर्कने 16.6 कोटी रुपये खर्च केले आहेत. तामिळनाडूच्या बाहेर, डीएमकेने कर्नाटक आणि केरळमध्ये अनुक्रमे 14 लाख आणि 13 लाख रुपये डिजिटल जाहिरातींवर खर्च केले आहेत.
भारत राष्ट्र समितीचा (BRS) गूगलवरील जाहिरातीचा खर्च नोव्हेंबर 2023 मधील विधानसभा निवडणुकांपुरता मर्यादित असून या पक्षाने 12 कोटींहून अधिक खर्च केला होता, पण सत्तेच्या शर्यतीत भारत राष्ट्र समितीला काँग्रेसकडून पराभव पत्करावा लागला होता.