Baramati Loksabha and Rohit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदानावेळी बारामतीत पैसे वाटल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला होता. त्यानंतर रोहित पवार यांची ट्विटरवरील तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. बारामतीच्या निवडणुकीत अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. यावेळी बारामती शहरात पैसे वाटप केल्याचा आरोप रोहित पवार यांनी सोशल मीडियाद्वारे केला होता. त्याची दखल निवडणूक आयोगात घेत बारामती शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 


बारामतीत मतदानावेळी पैसे वाटल्याचा आरोप करत केशव तुकाराम जोशी (वय 39) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानंतर 123(1), भा.द.वि.क. 171 ब या कलमान्वये बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र, हा गुन्हा अज्ञात व्यक्तीविरोधात दाखल करण्यात आलेला आहे. फिर्याद दिलेले केशव जोशी हे शाखा अभियंता पाटबंधारे उपविभाग बारामती येथे कार्यरत आहेत. त्यांनी ट्वीटरवर पैसे वाटपाचा व्हिडीओ पाहिला असे सांगत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. बारामती लोकसभा मतदारसंघात 23 लाख 72 हजार 668 के मतदार आहेत त्यातील 59.37% मतदान झाले होते. 


रोहित पवारांनी पैसे वाटपाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यावर कॅप्शन लिहले होत की, अजितदादा घ्या….. #ED आणि #CBI ने कारवाई केलेल्या तुमच्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसोबत तुमच्या पदाधिकाऱ्याच्या नातलगाचा पैसे वाटल्याचा आणखी एक व्हिडिओ…आता या व्हिडिओत जो माणूस दिसतोय तो तुमच्या ओळखीचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा नातलग नाही असं म्हणू नका.. आणि इतर लोकं तुमच्या कंपनीचे कर्मचारी नाहीत, असंही म्हणू नका!


पीडीसीसी बँकेविरोधातही कारवाई 


बारामतीच्या मतदानापूर्वी एक दिवस पीडीसीसी बँक मध्यरात्रीपर्यंत चालू होती, अशी तक्रार रोहित पवारांनी केली होती. रोहित पवारांच्या बँकेबाबतच्या तक्रारीलाही निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेतले होते. मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटण्यासाठी बँक मध्यरात्रीपर्यंत सुरु ठेवण्यात आली असल्याचा आरोप बँकेवर करण्यात आल्यानंतर बँक मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने रोहित पवारांनी शेअर केलेल्या व्हिडीओंचीही दखल घेतली आहे.






इतर महत्वाच्या बातम्या 


PDCC बँकेच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल, पैसे वाटण्यासाठी बँक सुरु ठेवल्याचा आरोप, रोहित पवारांच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल