PDCC Bank Pune and Rohit Pawar : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेल्हे शाखा (PDCC Bank Pune) आणि बँक मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटण्यासाठी बँक मध्यरात्रीपर्यंत सुरु ठेवण्यात आली असल्याचा आरोप बँकेवर करण्यात आला होता. दरम्यान, पीडीसीसी बँकेबद्दल शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी तक्रार केली होती. रोहित पवारांनी केलेल्या तक्रारीची निवडणूक आयोगाने (Election Commission) दखल घेतली आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


रोहित पवार काय म्हणाले?


पीडीसीसी बँक मध्यरात्रीपर्यंत चालू होती, अशी तक्रार आम्ही केली होती, त्या तक्रारीला निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेतले आहे. निवडणूक आयोगाकडून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बँकेच्या मॅनेजरने सहकार्य केलं नाही. सीसीटीव्ही फुटेज मिळालं. त्या फुटेजमध्ये 40 ते 50 लोक त्या ब्रँचमध्ये, डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये आत बाहेर आत बाहेर करत होते. यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. कारवाई केली, त्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार मानतो. 


काका पुतण्यांमधील संघर्ष वाढला 


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामधील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्रासमोर आलाय. त्यातच आता रोहित पवार आणि अजित पवार यांच्यामधील संघर्षही वाढू लागलाय. मतदानादिवशीच रोहित पवारांनी अजित पवारांनी गंभीर आरोप केले. तर अजित पवारांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्याला काही उद्योग नाही. माझ्याबद्दल वेडंवाकड बोलणं आणि लोकांच्यामध्ये गैरसमज निर्माण करणे. हेच त्याच काम सुरु आहे, असं अजित पवार म्हणाले. 


रोहित पवारांकडून भोरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप 


व्हाय सेक्युरिटी वाल्या गाड्या आहेत, पार्थ पवार सोडून सर्वत्र फिरताना दिसत आहेत. ते का फिरत आहेत? त्यामध्ये काय असते हे पाहण्याची गरज आहे. भोरमध्ये मावळच्या आमदारांचे नातेवाईक किंवा बंधू पैस वाटत होते. तेव्हा तिथे पकडलं, तिथे पोलीस उभे होते. पोलीसांनी काही केलं नाही. गाडी मात्र फोडली. पैसे आता पोलिसांनी नेले का कोणी नेले हे पाहावे लागेल, असं रोहित पवार म्हणाले.


अजित पवारांचे प्रत्युत्तर 


आता ही माझी गाडी आहे. गाडीमध्ये मी तुमच्याशी बोलत असताना कोणीतरी तिथे 500 च्या दोन-चार नोटा टाकल्या आणि शूटींग घेतलं, तर तुम्ही म्हणणार अजित पवारांच्या गाडीत नोटा सापडल्या? भोरमध्ये गाडीचंही उदाहरण दाखवलेलं आहे. हे सगळे प्रकार आहेत. निवडणूक आयोग आहे. पोलीस यंत्रणा आहे. त्यांनी याबाबतची चौकशी करावी, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Unmesh Patil on Girish Mahajan : गिरीश महाजनांना दोन नंबरच्या पैशाची मस्ती, संकटमोचक नाही, तर संकट आहे; उन्मेष पाटलांची टीका