Baramati Loksabha : बारामतीतील मतदानाच्या कमी टक्केवारीला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटलांना (Chandrakant Patil) जबाबदार धरलय. चंद्रकांत पाटील यांनी प्रचारादरम्यान बारामतीत येऊन शरद पवारांचा पराभव करणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचं वक्तव्य केले होते. ते वक्तव्य चुकीचं होतं असही आपण चंद्रकांत पाटील यांना सांगितल्याच अजित पवार म्हणालेत.  त्यामुळे बारामतीच्या निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच या निकालाचे खापर एकमेकांवर फोडण्याचा प्रयत्न सुरु झालाय का? असा प्रश्न विचारला जातोय. 


शरद पवारांचा पराभव करणे हा एकमेव उद्देश


संपूर्ण देशाच लक्ष लागलेल्या बारामतीतील सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या लढतीचा मतदान पार पडताच नव्या वादाला सुरुवात झालीय. प्रचारादरम्यान चंद्रकांत पाटील यांनी सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभे करण्यामागे फक्त शरद पवारांचा पराभव करणे हा एकमेव उद्देश असल्याच म्हटलं होतं.


बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी 59. 37 टक्के मतदान 


मात्र चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याचा बारामतीत उलट परिणाम झालाय, असं अजित पवारांच म्हणणय. बारामतीतील घटलेल्या मतदानाच्या टक्केवारीला अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याला जबाबदार धरलय . बारामती लोकसभा मतदारसंघात  यावेळी 59. 37 टक्के मतदान झालय. 2019 पेक्षा हे मतदान दोन टक्क्यांनी कमी आहे.  


रोहित पवारांनी स्टेजवर चंद्रकांत पाटलांचा 'तो' व्हिडिओ ऐकवला 


सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा पवार या राजकीय लढतीला भावनिक किनार लाभल्याने ही लढत अधिकाधिक लक्षवेधी होत गेली. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तर आमदार रोहित पवारांनी स्टेजवर चंद्रकांत पाटलांचा तो व्हिडिओ एकवत डोळ्यात पाणी आणून मतदारांना भावनिक आवाहन केलं होतं. चंद्रकांत पाटलांना जेव्हा या सगळ्याबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी बोलण्यास नकार दिला. 


अजित पवारांच्या  टीकेमुळे भाजपचे नेते आश्चर्यचकित झालेत.  चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा निषेध करायचा होता तर तो त्याचवेळी करायचा होता, त्यासाठी मतदान होईपर्यंत वाट का पाहिली? असा प्रश्न भाजपचे नेते खासगीत विचारत आहेत. त्यामुळे बारामती लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच दोन दांदामधे कलगीतुरा सुरु झाल्याचं चित्र आहे. 


4 जूननंतर काय होणार? 


निकालाआधीच निकालाची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न केला जाऊ लागल्याने निकाल काय असू शकतो? याचा अंदाज बांधण्यास सुरुवात झालीये. अजित पवारांच्या या हल्ल्याला उत्तर न देता सबुरीने घ्यायचं भाजपने ठरवलय.  कारण मतदानाचे महत्वाचे तीन टप्पे अजून बाकी आहेत. मात्र , चार जून नंतर महाराष्ट्रातील राजकीय नाते संबंध पुन्हा कसे बदलू शकतात? याची ही एक झलक मानली जाते आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या 


 नारायण राणे-विनायक राऊतांमध्ये चुरशीची लढत, रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदारसंघात कोण जिंकणार? माझा अंदाज