Balasaheb Thorat on Sanjay Gaikwad, यवतमाळ : शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची कार एका पोलीस कर्मचाऱ्याने धुतल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावर पोलीस युवराज मुळे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. "मी आज उशिरा ड्युटीवर आलो. थोडं अस्वस्थ व्हायला लागलं व मला चालू गाडीत उलटी झाली. त्यामुळे गाडी खराब झाली होती, मला कोणीही गाडी साफ करण्याचा किंवा धुण्याचा सांगितलं नव्हतं", असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर शाब्दिक प्रहार केलाय. 


कार्यकर्ते नागरिकांच्या अंगावर गाड्या घालत आहेत, हे आपण पाहिलं आहे


"आम्ही पाहातोय, सत्ताधारी लोकांमध्ये सत्तेचा अहंकार फार झालाय. हा अहंकार त्यांच्या आमदारांमध्ये झालाय. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही झालाय. आता संजय गायकवाडांची गाडी धुतली, पण यांचे कार्यकर्ते नागरिकांच्या अंगावर गाड्या घालत आहेत, हे आपण पाहिलं आहे. त्यांना वाचवायलाही पुन्हा सत्ताधारी लोक जात आहेत. महाराष्ट्रात महायुतीच्या तिन्ही घटकांविषयी प्रचंड नाराजी आहे", असं बाळासाहेब थोरात म्हणाले. 


लवकरच आम्ही आमचं जागा वाटप निश्चित करु आणि उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात करु


पुढे बोलताना थोरात म्हणाले, जे सर्व्हे समोर येतात ते स्वतंत्र एजन्सी करत आहेत. या सर्व्हेंमध्ये काँग्रेस पुढे आहे, ही वस्तुस्थिती आहे. महाविकास आघाडी म्हणून आमची चर्चा सुरु झाली आहे. दोन बैठका झालेल्या आहेत. लवकरच आम्ही आमचं जागा वाटप निश्चित करु आणि उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात करु. वंचित बहुजन आघाडीशी अद्याप काही चर्चा झालेली नाही. 


पुतळ्याच्या बाबतीत राजकारण करु नये, हे समजू शकतो. परंतु शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी अवहेलना झाली, ती घटना संपूर्ण महाराष्ट्राला वेदना देऊन जाणारी आहे. हे कोणालाही नाकारता येणार नाही. मात्र प्रक्षोभ होतो, त्याला राजकारण म्हणण्याचे कारण नाही. मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात लोक रस्त्यावर आले, त्याला तुम्ही राजकारण म्हणू शकत नाहीत. कशालाही राजकारण म्हणण्यापेक्षा लोकांच्या सरकार विरोधातील भावना समजून घेतल्या पाहिजेत. लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे, असं मतही थोरात यांनी व्यक्त केलं. 


पुतळ्याबाबत अनेक चुकीच्या गोष्टी आहेत. भारतीय जनता पक्षाचं आणि त्यांच्या नेत्यांचं राष्ट्रीय पुरुषांबाबतचं प्रेम बेगडी आहे. हे आता लक्षात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, मतं मागतात. त्यांच्या मनात बेगडीपणा आहे, खरं प्रेम नाही. खरी श्रद्धा नाही, हे त्यांनी सिद्ध केलंय, असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Sharmila Thackeray : शिवाजी महाराजांचा पुतळा अखंड पोकळ होता, समुद्र किनारी असा पुतळा कोण उभं करतं? शर्मिला ठाकरेंचा संताप