अकोला : राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन चांगलच राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना पुतळा दुर्घटनेवरुन पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन पुतळा दुर्घटनेची पाहणी केली. यावेळी, शिवसेना उबाठा ठाकरे गट आणि राणे पिता-पुत्र आमने सामने आल्याने चांगलाच तणाव निर्माण झाला होता. या तणावाच्या घटनेनंतर शिवसेनेकडून राणे पिता-पुत्रांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. त्यातच, महायुतीमधील आमदार अमोल मिटकरी यांनीही फोटो ट्विट करत पुतळा दुर्घटनेवरुन महायुती सरकारला टोला लगावला. त्यावरुन, आता आमदार अमोल मिटकरी आणि नितेश राणे यांच्यात जुंपली आहे. अमोल मिटकरी यांनी नितेश राणेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, त्यांना नेपाळला पाठविण्यासाठी महाराष्ट्रातील जनता उत्सुक असल्याचं म्हटलंय. 


सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील पुतळा दुर्घटनेनंतर महायुती सरकारची बाजू मांडत विरोधकांवर राणे कुटुंबीयांकडून प्रतिहल्ला केला जात आहे. विरोधकांच्या टीकेला राणेंकडून पलटवार केला जात आहे. आता, त्यावरुन शिवसेना उबाठ पक्षाचे पदाधिकारी व आमदार नितेश राणे आमने-सामने आल्याचं दिसू येतंय. तर, महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari)नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यातही जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार मिटकरींच्या टिकेवरुन टीका करताना, अमोल मिटकरी यांचं हिंदुत्त्व तपासण्याची वेळ आलीय, असे नितेश राणेंनी म्हटलं होतं. त्यावरुन, मिटकरींनी पलटवार केला आहे.     


भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगलीत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचं हिंदुत्व तपासण्याची वेळ आल्याचं वक्तव्य केलंय. तसेच, मिटकरींना हिंदू धर्मातून हाकलण्याची वेळ आलीय, असेही त्यांनी म्हटलं आहे. आता, स्वत:वरील टीकेला आमदार अमोल मिटकरींनीही जशात तसं प्रत्युत्तर दिलंय. नितेश राणे सारख्यांनी आपल्याला हिंदूत्व शिकवू नये असे मिटकरींनी म्हटले. तसेच, मालवणच्या पुतळा प्रकरणावर चकार शब्द न बोलणारे नितेश राणे या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठीच असे वक्तव्य करीत आहेत. राणेंनी हिंदू धर्मात किती वेद, किती शास्त्र आणि किती पुराणं आहेत, याचं उत्तर दिलं तर त्यांना आपण खरं हिंदू समजू, असा टोलाही अमोल मिटकरींनी लगावला आहे. तसेच, महाराष्ट्रातील जनता नितेश राणेंना नेपाळमध्ये पाठवायला उत्सुक असल्याचे म्हणत खोचक टीकाही मिटकरी यांनी केली आहे. 


महायुतीत ठिणगी?


दरम्यान, अमोल मिटकरी हे महायुतीमधील आमदार आहेत. तर नितेश राणे हेही महायुतीमधील भाजपचे आमदार आहेत. विशेष म्हणजे दोघेही सरकारमधील आमदार असल्याने या दोघांमुळे आता महायुतीत ठिणगी पडते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यापूर्वी महायुतीच्या मेळाव्यात प्रवक्ते, पदाधिकारी व आमदारांना एकमेकांवर टीका करण्यापूर्वी वरिष्ठांना विचारा, असा सल्लाही दिला होता.


हेही वाचा


IAS Transfer : राज्यातील 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; मनीषा आव्हाळेंवर पुण्यात मोठी जबाबदारी