Sandeep Deshpande on Raj Thackeray Delhi Visit : मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) दिल्लीला (Delhi) का गेलेत? हे काही तासांत स्पष्ट होईल. राज ठाकरे जो निर्णय घेतील तो हिंदुत्वाचा, महाराष्ट्राचा, पक्षाच्या हिताचा असेल, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर दिली आहे. तसेच, बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) आमचे ज्येष्ठ नेते आहेत, ते दिल्लीत गेले तर आम्हाला आनंद होईल, असं वक्तव्यही यावेळी बोलताना संदीप देशपांडे यांनी केलं आहे. 


मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, "राज ठाकरे दिल्लीला का गेलेत? हे काही तासांत स्पष्ट होईल. राज ठाकरे जो निर्णय घेतील तो हिंदुत्वाचा, महाराष्ट्राचा, पक्षाच्या हिताचा असेल." तसेच, बाळा नांदगावकर आमचे ज्येष्ठ नेते आहेत, ते दिल्लीत गेलेत तर आम्हाला आनंद होईल, असंही संदीप देशपांडे म्हणाले आहेत. 


राज ठाकरे आम्हाला जो आदेश देतील त्यानुसार आम्ही काम करू, कधी यश आलं, अपयश आलं, पण खचून गेलो नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणात चिखल झालाय हे खरं आहे. राज ठाकरे हित बघून निर्णय घेतील. महायुतीमध्ये जाणार वगैरे अशा बातम्या तुम्ही चालवताय. आम्हाला कोणतीही अट घातलेली नाही, असंही संदीप देशपांडे म्हणाले आहेत. 


"शासनानं मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांची बदली यापूर्वीच करायला हवी होती बजेट बाहेर जाऊन खर्च  केले ते चुकीचे होते. शिवाजी पार्क मैदानात आदित्य ठाकरेंच्या बाल हट्टासाठी दिगावकर यांनी माती टाकली होती, जे चुकीचं होतं ही माती उचलली जावी, याबाबत वॅार्ड ॲाफिसर यांनी आदेश दिले आहेत.", असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत. 


बाळा नांदगावकर दक्षिण मुंबईतून लोकसभा लढवणार? 


बाळा नांदगावकर दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघ म्हणजे, शिवसेनेचा बालेकिल्ला. याच मतदारसंघातून बाळा नांदगावकर आमदार म्हणून निवडून आले होते. दक्षिण मुंबई मतदारसंघातून सलग पाचवेळा बाळा नांदगावकर आमदार म्हणून निवडून आले आहेत. पहिल्या तीन टर्म शिवसेनेकडून आणि चौथी टर्म मनसेकडून बाळा नांदगावकरांनी विजय मिळवला होता. अशातच आता मात्र दक्षिण मुंबई मतदारसंघाचं चित्र पालटलं आहे. दक्षिण मुंबईत शिवसेनेचं तुलनेनं ठाकरेंचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच ठाकरेंचं महत्त्व कमी करण्यासाठी आता ठाकरेंनाच पुढे करण्याची खेळी भाजप खेळण्याच्या तयारीत असल्याची माहिती, सुत्रांच्या हवाल्यानं मिळत आहे. 


मनसे महायुतीत दाखल झाली, तर महायुतीकडून मनसेला दक्षिण मुंबई मतदारसंघ सुटण्याचं बोललं जात आहे. अशावेळी मनसे माजी आमदार आणि मराठी चेहरा असलेल्या बाळा नांदगावकरांना लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार अशा चर्चा सुरू आहेत. अशातच संदीप देशपांडेंच्या वक्तव्यानं चर्चांनी जोर धरला आहे. एकंदरीत आगामी लोकसभेत दक्षिण मुंबईत चुरस रंगणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच, आता मनसेला जर महायुतीकडून दक्षिण मुंबईची जागा देण्यात आली तर, काँटे की टक्कर पाहायला मिळेल यात काही शंका नाही. 


मनसेच्या येण्यानं शिंदेंची गोची? 


राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यातल्या सत्ताधारी महायुतीतला नवा घटक पक्ष बनण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे राजधानी दिल्ली दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वीच मनसे महायुतीमध्ये सामिल होणार  आणि मनसेला 1-2 जागा मिळतील, अशी बातमी एबीपी माझाने प्रसारित केली होती. या बातमीवर आता शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कारण आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि मनसे या दोन पक्षांमधल्या युतीच्या हालचालींना वेग आला आहे. त्यादृष्टीनं राज ठाकरेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक होणार आहे. भाजप कोअर कमिटीच्या संध्याकाळच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आधीच दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यापाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही दिल्लीला रवाना झाले आहेत.