Raj Thackeray In Delhi : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तोंडावर महायुतीच्या जागावाटपाची (Mahayuti Seat Allocation ) चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच आता शेवटच्या क्षणी मनसे प्रमुख राज ठाकरेंची (Raj Thackeray) एन्ट्री झाली आहे. कारण भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील महायुतीत मनसेला (MNS) घेण्याच्या निर्णय झाला असून, यावर महायुतीमधील सर्व मित्रपक्षांचे एकमत झाले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सोमवारी रात्री अचानक राज ठाकरे दिलील्ला रवाना झाले आहेत. तर, मनसेकडून दक्षिण मुंबई (South Mumbai), नाशिक (Nashik) किंवा शिर्डी (Shirdi) या तीन पैकी किमान दोन लोकसभा मतदारसंघांची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


मागील लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंचा 'लाव रे तो व्हिडिओ'चा अनुभव पाहता आणि मुंबई महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात मैदान मारण्यासाठी भाजपकडून मनसेला जवळ करण्याचा प्रयत्न होतांना दिसत आहे. विशेष म्हणजे याचा तेवढाच फायदा महायुतीत शिंदेसेनेला देखील होणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंना महायुतीत घेण्याची मागील काही दिवसांपासून हालचाली सुरु होत्या. दरम्यानच्या काळात मनसेच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी देखील घेतल्या. आता थेट राज ठाकरेंना दिल्लीत बोलवण्यात आले असून, जागावाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या इंजिनला किती जागांचे डब्बे लागतात हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 


बाळा नांदगावकरांना शिर्डीतून उमेदवारी देण्यावर एकमत होण्याची शक्यता?


राज ठाकरे रात्री उशिरा दिल्लीत पोहचले आहेत. रात्री उशिरा किंवा आज सकाळी अमित शाह यांची भेट घेणार होते. ज्यात मनसेकडून दक्षिण मुंबई, नाशिक किंवा शिर्डी या तीन पैकी किमान दोन लोकसभा मतदारसंघांची मागणी केली जाणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या तीनही जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहेत. त्यापैकी एक जागा मनसेचे नेते बाळा नांदगावकरांना देण्याची भाजपने तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची देखील यासाठी संमती असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, राजकीय गणित पाहिल्यास दक्षिण मुंबईची जागा भाजपला हवी असून, शिंदेसेना नाशिकची जागा सोडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे राखीव मतदारसंघ असलेल्या शिर्डीतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी देण्यावर एकमत होण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


मला केवळ निरोप आला होता अन्... दिल्लीत पाय ठेवताच राज ठाकरे काय म्हणाले?