Chandrapur Lok Sabha Election : चंद्रपूरमधून काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) असतील की शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) अशी चर्चा रंगली असता प्रतिभा धानोकर यांनी ट्विट करून उमेदवारी आपलीच आणि विजयही आपलाच असा दावा केला आहे. प्रतिभा धानोरकर यांनी सोमवारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईत भेट घेतली. त्यानंतर केलेल्या या ट्विटला महत्व प्राप्त झालं आहे. उमेदवारी आपल्यालाच मिळणार या प्रतिभा धानोरकर यांच्या दाव्यामुळे शिवानी वडेट्टीवार यांना संधी मिळणार नाही अशी शक्यता असल्याचं बोललं जातंय. 


आपली उमेदवारी फिक्स, फक्त धीर धरा 


प्रतिभा धानोरकरांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय की, आज काळ आणि वेळ बदलली असली तरी परिस्थिती बदलली नाही. आपली उमेदवारी फिक्स आहे. फक्त या हक्काची आणि न्यायाची उमेदवारी आपल्या हाती येईपर्यंत आपण सर्वांनी थोडं धीराने वागायचं आहे आणि त्यानंतर मैदान गाजवायचं आहे.


 






चंद्रपुरातील वरोरा विधानसभेच्या आमदार प्रतिभा धानोरकर या लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यांच्यासमोर त्यांच्याच पक्षाच्या विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांचं नावदेखील चर्चेत आहे. दोन्ही गटाकडून उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. 


भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांनी उमेदवारी


चंद्रपूरसाठी भाजपने या आधीच उमेदवारी जाहीर केली असून त्या ठिकाणी राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नाव जाहीर करण्यात आलं आहे. सुधीर मुनगंटीवार हे लोकसभेसाठी इच्छुक नव्हते. पण भाजपने ही जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच या ध्येयाने मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या रिगंणात उतरवलं आहे.


चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त होती. ते काँग्रेसचे राज्यातले एकमेव खासदार होते. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसची चांगली ताकद आहे. त्या ठिकाणी आता त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या तिकिटासाठी इच्छुक आहेत. 


तर दुसरीकडे विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यादेखील चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी विजय वडेट्टीवार यांनी दिल्लीपर्यंत चांगलीच फिल्डिंग लावल्याची माहिती आहे. 


महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झालं असून एक दोन दिवसात ते जाहीर होण्याची शक्यता आहे. 


ही बातमी वाचा: