Raju Karemore, भंडारा : राज्यातील महायुती सरकारने नुकतीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना अमलात आणली आहे. याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने बहिणींसोबत संवाद साधण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भंडाऱ्याच्या दौऱ्यावर होते. या कार्यक्रमाच्या नियोजनावरून राज्यातील सत्ताधारी अजित पवार गटाचे तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांना धमकावल्याचा एक ऑडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Abp माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करीत नाही.
राजू कारेमोरे यांची महिला अधिकाऱ्यांशी बोलताना जीभ घसरली?
या ऑडिओमध्ये कार्यक्रमाच्या नियोजनावरून आमदार राजू कारेमोरे यांची महिला अधिकाऱ्यांशी बोलताना जीभ घसरली आहे. महिला अधिकाऱ्यांना निपटविण्याची भाषा बोलल्याचं या ऑडिओमध्ये स्पष्ट ऐकायला येत आहे. भंडाऱ्याच्या तुमसर येथे शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यक्रम होता. जनसन्मान यात्रेनिमित्त ते लाडक्या बहिणींशी संवाद साधणार होते. मात्र, गुरुवारी आणि शुक्रवारी भंडारा जिल्ह्यात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळं अजित पवारांचा कार्यक्रम असलेले स्थळावर चिखल निर्माण झाल्याने त्यावर तातडीनं उपाययोजना करावी, यासाठी तुमसर नगरपालिकेची जबाबदारी असताना त्यांच्याकडून ते करण्यात आलं नाही. यावरून आमदार कारेमोरे यांनी महिला अधिकाऱ्याला धारेवर धरलं.
माझ्या बोलण्याचा विपर्यास केला, अर्धीच ऑडिओ क्लिप व्हायरल करुन माझी बदनामी
या ऑडिओ क्लिपबाबत आमदार राजू कारेमोरे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. शासकीय कार्यक्रमाचं निमंत्रण प्रशासनाकडून सर्वांना देण्यात आलं. कार्यक्रमाला येणाऱ्या महिलांची उपस्थिती लक्षात घेता नियोजन ढिसाळ होऊ नये आणि महिलांसह नागरिकांना सुविधा मिळावी या दृष्टीनं मुख्याधिकारी वैद्य यांना फोन केला. मात्र त्यांच्याकडून उडवाउडवीचं उत्तरं आली. मी कार्यक्रम निपटविण्याबाबत बोललो. मात्र, महिला अधिकाऱ्यांनी माझ्या बोलण्याचा विपर्यास केला आणि अर्धीच ऑडिओ व्हायरल करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे.
इतर महत्त्वाची बातम्या