मुंबई : धर्मवीर 2 चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा दिवंगत आनंद दिघेंच्या मृत्यूप्रकरणावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. यापूर्वी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटात आनंद दिघे (Anand dighe) यांच्या मृत्यूबाबत संशयास्पद शेवट दाखवण्यात आला होता. रुग्णालयात आनंद दिघे यांचा मृत्यू झाल्यानंतर शिवसैनिकांनी सिंघानिया हॉस्पीटलला आग लावून तोडफोड केल्याचंही चित्रपटात दिसून आलं होतं. त्यामुळे, धर्मवीर 2 सिनेमात नेमकं काय दाखवण्यात येईल, याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र, धर्मवीर 2 सिनेमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं (Eknath Shinde) उदात्तीकरण करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाकडून होत आहेत. त्यातच, आता पुन्हा एकदा आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर, आता संजय निरुपम (Sanjay nirupam) यांनीदेखील आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित करत प्रश्न विचारले आहेत.
संजय शिरसाट यांनी म्हटले की, आनंद दिघे साहेब यांच्या मृत्युसंदर्भात मी जे वक्तव्य केले त्याचे पडसाद राज्यभर उमटले. मात्र, माझी जी शंका होती त्यावर मी बोललो. दिघे साहेबांवर बाळासाहेबांचे अतोनात प्रेम होते. किंबहुना दिघे साहेबांनी कधी बाळासाहेबांच्या बाजूला देखील बसण्याची हिम्मत केली नाही. दिघे साहेब किंग होताय याची खुन्नस काहींना होती, त्यामुळे हे सर्व झाले. आनंद दिघे यांना मोठ्या पदावर बसवलं तर आपल्याला अडचण होईल, अशा लोकांनीच त्यांचा काटा काढला. मी अशी अनेक प्रकरण नावानिशी उघड करण्याची ताकत ठवतो, असे म्हणत आमदार संजय शिरसाट यांनी खळबळजनक आरोप केला आहे. दादरमध्ये एक मेळावा झाला, त्यात गद्दार नेता नव्हता. त्यावेळी आनंद दिघे साहेब त्याला शोधत होते. तसेच राज ठाकरे पक्ष सोडून का गेले? कुणामुळे गेले? याची कारण काय? हे सर्व लोक कुणाच्या मुळे गेले? हे सामोर आलेले नाही. त्यांची अडचण होणाऱ्या लोकांनीच त्यांचा खूण केला, असा माझा आरोप असल्याचेही संजय शिरसाट यांनी म्हटलंय. दुसरीकडे काँग्रेसमधून शिवसेनेते आलेल्या संजय निरुपम यांनीही आनंद दिघेंच्या मृ्त्यूबाबत शंका उपस्थित करत त्यांना मारण्यात आल्याचं म्हटलंय.
मला आजही लक्षात आहे, आनंद दिघे यांच्या जीपला अपघात झाल्यानंतर त्यांना सिंघानिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून त्या रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, ज्या पद्धतीने त्यांचा मृत्यू झाला, तो आजही संशायस्पद आहे. विरोधक म्हणतात आजपर्यंत का बोलले नाहीत, आत्ताच का बोलतात, याला काही अर्थ नाही. मात्र, आजही सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनात भावना आहे की, आनंद दिघे यांचा मृत्यू स्वाभाविक नाही. आनंद दिघेंना ठार मारण्यात आलं होतं, त्यांना कुणी मारलं, का मारलं, कोणत्या उद्देशाने मारलं ही एक राज की बात आहे, असेही संजय निरुपम यांनी म्हटलं आहे. दरम्यान, संजय निरुपम यांच्या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटणार असल्याचे दिसून येते.
चौकशीसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिघे साहेबांचे जवळचे शिष्य राहिले आहेत. जर, आज आनंद दिघेंच्या मृत्युच्या तपासाची भावना एकनाथ शिंदे यांची असेल तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असेही निरुपम यांनी म्हटले.
हेही वाचा
धक्कादायक! बँकेच्या लॉकरमधून 25 तोळं सोनं गायब; महिलेला रडू कोसळले, पोलिसांत धाव