मुंबई:  राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा अर्ज भरत पक्षात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयाने अशोक चव्हाण यांची काँग्रेससोबत असलेली ५० वर्षांची नाळ तुटली. हा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपे नव्हते, मला खूप विचार करावा लागला, असे अशोक चव्हाण यांनी पक्षप्रवेश सोहळ्यावेळी सांगितले. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना आता भाजपकडून राज्यसभेवर पाठवले जाणार आहे. मात्र, चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये येताना उपमुख्यमंत्रीपद मिळावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. तसेच त्यांनी महसूल किंवा सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद मिळावे, असा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, भाजपच्या एका बड्या नेत्याने अशोक चव्हाणांच्या या प्रस्तावाला विरोध केल्याचे समजते.


अशोक चव्हाण यांना महाराष्ट्राच्या राजकारणात राहायचे होते. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्रीपद आणि एका वजनदार खात्याची मागणी केली होती. परंतु, अशोक चव्हाण महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री झाल्यास दोन सत्ताकेंद्र तयार होऊ शकतात. अशोक चव्हाण नवा प्रभावशाली मराठा चेहरा म्हणून उदयाला येऊ शकतो, असे भाजपच्या बड्या नेत्याचे म्हणणे होते. या कारणांमुळे भाजप नेतृत्त्वाने अशोक चव्हाण यांना तुर्तास महाराष्ट्राच्या राजकारणाऐवजी राज्यसभेवर पाठवल्याचे सांगितले जाते. 


अशोक चव्हाणांच्या मुलीला भोकर मतदारसंघातून उमेदवारी?


अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रसचे १५ आमदार पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या नाराज आमदारांसाठी भाजपमध्ये जाण्याचा दरवाजा उघडला आहे. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार क्रॉस व्होटिंग करण्याची शक्यता आहे.  याशिवाय अशोक चव्हाण यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या मुलीला भोकर मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती. भाजप पुन्हा सत्तेत आल्यास मुलीला मंत्रीपदही द्यावे लागेल, अशी बोलणी अशोक चव्हाण यांनी भाजपसोबत केल्याची चर्चा आहे.


काँग्रेसच्या नेतृत्त्वाची चव्हाणांवर टीका


 काँग्रेसचा (Congress) हात सोडून भाजपचं (BJP) कमळ हाती घेतल्यानंतर अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर काँग्रेसने टीकास्त्र सोडलं. एवढे भित्रे असू नये, जो सच्चा शिपाई असतो, तो मैदान सोडत नाही, असा हल्लाबोल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला (Ramesh Chennithala) यांनी केला.


आणखी वाचा


मोठी बातमी: नारायण राणेंना राज्यसभेची उमेदवारी नाही, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरणार


शरद पवार मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत, राज्यसभेसाठी छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही!