मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे स्वगृही म्हणजे भाजपमध्ये परतणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. भाजपचे आमदार आणि देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू सहकारी अशी ओळख असलेल्या गिरीश महाजन यांनी स्वत:च तसा दावा केला होता. एकनाथ खडसे थेट दिल्लीतील भाजप नेतृत्त्वाच्या संपर्कात असल्याचे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी म्हटले होते. त्यामुळे  एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


एकनाथ खडसे यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, गेले काही दिवसांपासून मी  भाजपामध्ये प्रवेश करणार, अशा अफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा, या हेतून पसरविल्या जात आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे व राहणार. कार्यकर्त्यांनी, आणि नागरिकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन एकनाथ खडसे यांनी केले आहे.


गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?


गिरीश महाजन यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाविषयी भाष्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी फार जोर लावत आहेत, असे मला कळाले आहे. दिल्लीतून आणि राज्यातून या बातम्या माझ्यापर्यंत आल्या आहेत. पण अद्याप पक्षाच्या नेत्यांकडून मला याबाबत विचारणा झालेली नाही. मला वाटतं तसं काही  प्रयोजन नाही. मला अजूनतरी कोणीही एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये परत घ्यायचे किंवा नाही, याबद्दल विचारलेले नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. कदाचित एकनाथ खडसे यांची थेट वरुन हॉटलाईन असेल तर त्यांनी लावावी, असे गिरीश महाजन यांनी म्हटले होते.


आणखी वाचा


सलीम कुट्टाशी संबंध प्रकरणी गिरीश महाजन यांचीही एसआयटी चौकशी करा; एकनाथ खडसे यांची मागणी


एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्याच्या तयारीत, मोदी-शाहांच्या ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा, भाजपच्या बड्या नेत्याचा दावा