मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी मंगळवारी दुपारी मुंबईतील भाजप मुख्यालयात भाजपमध्ये रितसर प्रवेश केला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे समर्थक माजी आमदार अमर राजूरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण पक्षप्रवेशासाठी भाजपच्या कार्यालयात आल्यानंतर आशिष शेलार, अतुल भातखळकर यांनी त्यांचे स्वागत केले. चव्हाण यांनी भाजप मुख्यालयात पाऊल ठेवताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा अर्ज भरत रितसर भाजपमध्ये प्रवेश केला. 


यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांचे पक्षात स्वागत केले. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेतृत्त्व, अनेक वर्षे विधानसभा आणि लोकसभा गाजवणारे नेते, विविध मंत्रीपद भुषविलेल्या तसेच दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण साहेब आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले.


अशोक चव्हाणांच्या ५० वर्षांच्या सवयीने घात केला, अन् एकच हशा पिकला


अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला आशिष शेलार यांचा उल्लेख करताना मुंबई भाजपचे अध्यक्ष ऐवजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष, असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर एकच हशा पिकला. यावर बाजूलाच बसलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना काँग्रेस नव्हे भाजपचे अध्यक्ष, अशी आठवण करुन दिली. 


अशोक चव्हाण काय म्हणाले?


मी ३८ वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर आज नवीन सुरुवात करत आहे. विकासाच्या राजकारणाला आम्ही नेहमीच साथ दिली. देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच आम्हाला सकारात्मक साथ दिली. मी आजपर्यंत काँग्रेसचे प्रामाणिकपणे काम केले. यापुढे प्रामाणिकपणे भाजपचे काम करेन. राज्यात भाजपला अधिकाअधिक जागा कशा मिळतील, यासाठी मी प्रयत्न करेन. मी कोणावरही व्यक्तिगत टीका किंवा दोषारोप करणार नाही.  पंतप्रधान मोदी देशाचा सबका साथ, सबका विकास करत आहेत. पक्षाकडून मला जे सांगितले जाईल, ते काम मी करेल. काँग्रेस पक्ष सोडणे हा माझा व्यक्तिगत निर्णय होता. मी कोणालाही माझ्यासोबत येण्यास सांगितलेले नाही, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. हा निर्णय माझ्यासाठी सोपा नव्हता. त्यासाठी मला खूप विचार करावा लागला. पण देशाच्या विकासासाठी, निर्मितीसाठी योगदान देता यावे, यासाठी मी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी म्हटले.


अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार?


अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार का, याविषयी फडणवीसांना विचारण्यात आले. त्याला उत्तर देताना फडणवीसांना म्हटले की, मी याबाबत अधिक भाष्य करणार नाही. मी योग्यवेळी बोलेन. राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा केंद्रातील नेते करतील. अशोक चव्हाण यांची मदत कुठे घ्यायची आहे, हे आम्हाला माहिती आहे. अशोक चव्हाण यांना राजकारणाचा आणि प्रशासनाचा दीर्घ अनुभव आहे. त्याचा फायदा आम्ही निश्चितपणे घेऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


काँग्रेसला त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही: फडणवीस


काँग्रेसला त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही. आज काँग्रेसमध्ये पार्टी कुठल्या दिशेने चालली हे कळत नाही. देशातील मुख्य धारेत जायला पाहिजे असे मुख्य नेत्याना वाटते, म्हणून नेते आमच्याकडे येत आहेत. अशोक चव्हाण दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांचा रोल काय असेल याबाबत केंद्र सरकारसोबत बोलून निर्णय घेतला जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.


आणखी वाचा


तेव्हा मनमोहन सिंगांनी गोपीनाथ मुंडेंना रोखलं नसतं तर भाजप पूर्णपणे फुटली असती; अजित पवारांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल