गोंदिया : आमचा एक संतोष देशमुख गेला, पण यापुढे आम्ही हे सहन करणार नाही. धनंजय देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबीयांना जर धक्का बसला तर घरात घुसून मारू, असा शेट इशारा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला. मी आतापर्यंत धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं नाही, देशमुख कुटुंबीयांना जर त्रास झाला तर त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांसाठी न्याय मागितल्यानंतर आम्ही जातीयवादी कसे काय? असा सवालही जरांगे यांनी विचारला. संतोष देशमुखांच्या हत्येकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी मनोज जरांगे बोलत होते.
त्याच्या बोलण्याकडे अजिबात कोणी लक्ष देऊ नका- आशिष जयस्वाल
बीडचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावरून मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा खणखणीत इशारा दिल्यानंतर आता महायुतीच्या नेत्यांकडूनही प्रत्युत्तर देण्यात येत आहे. दरम्यान, यावर बोलताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनीही मनोज जरांगेंवर जहरी टीका केली असून मनोज जरांगेच्या डोक्यात फरक पडला असल्याचे म्हटले आहे. तो वैफल्यग्रस्त झाला आहे. त्याच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देऊ नका, अशा शब्दात त्यांनी जहरी टीका केली आहे.
प्रत्येक गोष्टीचं राजकीय भांडवल करायचं नसतं- आशिष जयस्वाल
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांमध्ये महायुतीचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. यावरून बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते आशिष जयस्वाल यांनी विरोधकांना टोला लगावला असून प्रत्येक गोष्टीचा राजकीय भांडवल करायचं नसतं, बीड प्रकरणांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गृहमंत्री असून ते जो कुणी आरोपी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करतील, अशी प्रतिक्रिया मंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार व मंत्री आशिष जयस्वाल हे आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे गोंदियामध्ये आगमन होताच भव्य बाईक रॅली काढत शिवसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. आशिष जयस्वाल हे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता यावेळी शिवसैनिकांनी भव्य बाईक रॅली काढत आशिष जयस्वाल यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.