Aam Aadmi Party: पंजाबमधील मोठ्या विजयानंतर आम आदमी पक्षाने आता इतर राज्यांमध्येही आपले संघटन मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: पक्षाच्या नजरा आता त्या राज्यांवर आहेत, जिथे लवकरच निवडणुका होणार आहेत. गुजरात, हिमाचल आणि राजस्थान हे त्यापैकी प्रमुख राज्यात आहेत. जिथे या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला निवडणुका होणार आहेत. आम आदमी पक्षाने आसाम, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, पंजाब, राजस्थान आणि तेलंगणा या देशातील 9 राज्यांच्या प्रभारींची यादी जाहीर केली आहे. या प्रभारींना पक्षाच्या विस्ताराचे आणि संघटनेला मजबूत करण्याचे काम सोपवण्यात आले आहे.


आम आदमी पक्षाने डॉ.संदीप पाठक यांची गुजरातचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. डॉ.संदीप पाठक यांना पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या विजयाचे चाणक्य मानले जाते. या वर्षाच्या अखेरीस गुजरात विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. अशातच पक्षाने गुजरात निवडणूक लढवण्याची घोषणाही केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'आप'ने गुजरातमधील निवडणूकही पूर्ण जोमाने लढवण्याची तयारी सुरू केली असून पंजाबच्या धर्तीवर गुजरातमध्येही नव्या रणनीतीने निवडणूक लढवावी, अशी पक्षाची इच्छा आहे. 


हिमाचल प्रदेशसाठी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर दुर्गेश पाठक यांना प्रभारी बनवण्यात आले आहे. दुर्गेश पाठक यांच्याकडे याआधी गोवा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती. यावेळीच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला गोव्यात 2 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळेच पंजाबला लागून असलेल्या हिमाचलमधील निवडणुकीची जबाबदारी दुर्गेश पाठक यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.


राजस्थानमध्ये आम आदमी पक्ष संपूर्ण संघटना बदलून नव्याने सुरुवात करणार आहे. कारण याआधी दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यांत काँग्रेसला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवून आम आदमी पक्षाने आपले स्थान निर्माण केले आहे. अशा स्थितीत राजस्थानमध्येही काँग्रेसला सत्तेतून बेदखल करून तिथेही पक्ष आपले स्थान निर्माण करू शकतो, असे पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे.