Omprakash Rajenimbalkar vs Archana Ranajagjitsinha Patil, Dharashiv Loksbha : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाबाबत महायुतीतील तिढा अखेर सुटलाय. ठाकरे गटाकडून विद्यमान ओमराजे निंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीकडून ही जागा कोण लढवणार? याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर ओमराजेंविरोधात लढण्यासाठी त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी सरसावले आहेत. भाजप आमदार राणा जगजतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील (Archana Ranajagjitsinha Patil) यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत उस्मानाबाद लोकसभेतून उमेदवारी मिळवली आहे. त्यामुळे पाटील-निंबाळकर घराणे पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहे.
दीर-भावजयमध्ये रंगणार सामना
ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील म्हणजेच पाटील विरुद्ध निंबाळकर हा संघर्ष धाराशिव जिल्ह्यासह महाराष्ट्राला आता नवीन राहिलेला नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे रिंगणात आहेत. तर महायुतीची ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली. त्यानंतर राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत उमेदवारी पदरात पाडून घेतली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश पार पडला. त्यामुळे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेली दोन घराणी आता लोकसभेच्या रिंगणात पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहेत.
कोण आहेत अर्चना पाटील?
माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांची सून आणि भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी असलेल्या अर्चना पाटील यांनी लेडीज क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्यास सुरुवात केली होती. त्यानंतर धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. महिलांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवून त्या संपर्कात असणाऱ्या नेतृत्वाला महायुतीकडून रिंगणात उतरविण्यात आले आहे. मात्र, दांडगा जनसंपर्क असलेल्या ओमराजे निंबाळकर यांच्या विरुद्ध त्यांना निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे अर्चना पाटील यांच्यासमोर तडगे आव्हान असणार आहे. मात्र,विजय आमचाच नक्की होणार असा विश्वास महायुतीचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
2019 मध्ये ओमराजेंकडून राणा जगजितसिंह यांचा दारुण पराभव
2019 च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राणा जगजितसिंह पाटील यांनी उमेदवारी मिळवली होती. 2019 मध्येही धाराशिवमध्ये पाटील विरुद्ध निंबाळकर असा संघर्ष पाहायला मिळाला होता. या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी राणा जगजितसिंह पाटील यांचा सव्वा लाख मतांनी दारुण पराभव केला होता. 2019 च्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आता पाटील घराणेकडे आहे. मात्र समोर ओमराजे निंबाळकर यांचे तगडे आव्हान असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या