ठाणे: लोकसभा निवडणुकीसाठी भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिवंडी लोकसभा प्रभारी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा (Balya Mama) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर होताच भिवंडीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठा उत्साह व जल्लोष साजरा केला. भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार कपिल पाटील (Kapil Patil) यांना याआधीच उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून भिवंडी लोकसभेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून रस्सीखेच सुरू होती. अखेर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भिवंडी लोकसभेसाठी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.


सुरेश म्हात्रे यांनी याआधी २००९ मध्ये शिवसेनेतू भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवली होती.२०१४ मध्ये मनसेतर्फे भिवंडी लोकसभेची निवडणूक लढली होती,ज्यात कपिल पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. तर २०१९ मध्ये शिवसेना पक्षात असतांनाही महायुती व भाजपचे उमेदवार असलेले खासदार कपिल पाटील यांना म्हात्रे यांनी जाहीर विरोध केला होता. तेव्हापासून सुरेश म्हात्रे व कपिल पाटील यांच्यातील राजकीय वाद समोर आला आहे.आता केंद्रीय पंचायती राज्यमंत्री असलेल्या कपिल पाटील यांच्यासमोर सुरेश म्हात्रे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. बाळ्या मामा यांची उमेदवारी जाहीर होताच भिवंडीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, ढोलताशे वाजवत व एकमेकांना पेढे बरोबर जल्लोष केला आहे.
          
महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय नेत्यांबरोबरच आदरणीय शरदचंद्र पवारांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा न जाता भाजपच्या उमेदवाराचा निश्चितच पराभव करून भिवंडी लोकसभा मतदार संघातील प्रश्न सोडवून खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करू अशी प्रतिक्रिया सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे.


कपिल पाटील यांना काँटे की टक्कर देणारा उमेदवार


सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना शरद पवार गटाने उमेदवारी जाहीर केल्याने भिवंडी लोकसभेची यंदाची लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. भाजपचे कपिल पाटील 2014 आणि 2019 अशा दोन वेळेस भिवंडीतून निवडून आले आहेत. त्यांच्याविरोधात मतदारसंघात अँटी इन्कम्बन्सी असली तरी भिवंडीत कपिल पाटील यांच्यासमोर उभा राहू शकेल, असा उमेदवार रिंगणात दिसत नव्हता. मात्र, आता कपिल पाटील यांच्याशी सर्वबाबतीत बरोबरी करु शकणाऱ्या बाळ्यामामा यांना रिंगणात उतरवून शरद पवार यांनी भिवंडीत मोठा डाव खेळल्याचे बोलले जात आहे. 


सुरेश म्हात्रे हे भिवंडीतील स्थानिक नेते असून त्यांना कपिल पाटील यांच्याप्रमाणेच आगरी समाजाचा पाठिंबा आहे. आगरी समाजातील तरुणांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ आहे. याशिवाय, जात किंवा धर्म न बघता आपल्यासोबत काम करणाऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या त्यांच्या सवयीमुळे बाळ्यामामा यांनी भिवंडीत आगरी समाजासोबत अन्य समूहाच्या लोकांनाही आपल्यासोबत जोडले आहे. त्यामुळे भिवंडी लोकसभेच्या लढाईत बाळ्यामामा म्हात्रे हे कपिल पाटलांसाठी तुल्यबळ उमेदवार मानले जात आहेत. यंदा त्यांच्यापाठिशी महाविकास आघाडीची ताकद उभी राहिल्याने सुरेश म्हात्रे भिवंडीतील कपिल पाटलांची सत्ता उलथवून लावणार का, हे आता पाहावे लागेल. 



सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा यांची राजकीय कारकीर्द 


1996 शिवसेना शाखा प्रमुख पदी नियुक्ती झाली व  2000 मध्ये  शिवसेना विभाग प्रमुखपदी काम पाहिले. तसेच 2004 मध्ये शिवसेना उपाध्यक्ष भिवंडी पदी नियुक्ती झाली. 2009 साली भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षमार्फत निवडणूक लढवली. 2011 साली मनसेत पक्ष प्रवेश व भिवंडी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. 2013 मनसे पक्ष ठाणे, जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती.  2014 मध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघातून मनसे पक्षामार्फत कपिल पाटील यांच्यविरोधात निवडणूक लढवली.


2015 शिवसेना पक्ष प्रवेश व ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्कप्रमुख पदी नियुक्ती. 2017 ठाणे जिल्हा परिषद सदस्यपदी निवड. 2018 जिल्हा परिषद ठाणे शिवसेना गटनेते पदी नियुक्ती. 2018 सार्वजनिक बांधकाम आणि आरोग्य विभाग जिल्हा परिषद ठाणे सभापती पदी नियुक्ती. 2021 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षप्रवेश व ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती 2022 शिवसेना पक्ष प्रवेश व भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती आणि 2024 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भिवंडी लोकसभा मतदारसंघ प्रभारी नियुक्ती.तसेच धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक व तेजस्वी एज्युकेशन सोसायटी धर्मवीर मित्र मंडळ या संलग्न सामाजिक संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.


आणखी वाचा


शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर, बीडमधून बजरंग सोनावणे, भिवंडीतून बाळ्यामामा म्हात्रेंना उमेदवारी