Anjali Damania Write Letter to President: मुंबई : लोकसभा निवडणुकांचं (Lok Sabha Election) बिगुल वाजलं असून सर्वच पक्षांनी आपापली रणनिती आखली असून जय्यत तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकांच्याच पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच भाजपशी (BJP) काडीमोड घेत तब्बल अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress) प्रवेश केलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse News) लवकरच स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. एवढंच नाहीतर या फक्त चर्चाच नाहीत, असे स्पष्ट संकेत स्वतः एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) दिले आहेत. तसेच, एकनाथ खडसे स्वगृही परतल्यानंतर भाजपकडून त्यांची नियुक्ती राज्यपालपदी केली जाणार असल्याचंही बोललं जात आहे. पण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी याला कडाडून विरोध केला आहे. त्यांनी यासंदर्भात थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांना पत्र लिहिलं आहे.
आमदार एकनाथ खडसेंनी सुमारे अडीच वर्षांपूर्वी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांची (Sharad Pawar) साथ देणं पसंत केलं. आता मात्र त्यांनी घरवापसी करणार असल्याचे संकेत दिले आहेत. भाजपमध्ये गेल्यानंतर खडसेंची राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तेव्हापासूनच राजकीय वर्तुळात यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहेत. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहून एकनाथ खडसेंच्या राज्यपाल पदावरील नेमणुकीला ककाडून विरोध केला आहे.
अंजली दमानिया यांनी राष्ट्रपती दौपदी मूर्म यांना एकूण सहा पानांचं पत्र लिहिलं आहे. त्या पत्राची प्रत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनाही पाठवलेली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली.
राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध प्रलंबित असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची माहिती दिली आहे. नैतिक पतनाचा आरोप असलेल्या व्यक्तीला राज्यपाल बनवता येत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे. या प्रलंबित प्रकरणांमुळे खडसेंची एखाद्या राज्याच्या राज्यपालपदी नेमणुकीची शिफारस झाली तर ती नाकारावी, अशी विनंती त्यांनी वरील नेत्यांना केली. तसेच, राष्ट्रपती या संविधान आणि कायद्याचं रक्षण करतील, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे.
एकनाथ खडसे राष्ट्रवादी शरद पवार गट सोडून लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपमध्ये प्रवेश होताच खडसेंची राज्यपाल म्हणून वर्णी लागणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावर दमानिया यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची यादी देत खडसेंच्या पुनर्वसनावर आक्षेप घेत आले. तसेच, घटनेच्या कलम 60 नुसार, राष्ट्रपती संविधान आणि कायद्याचे जतन, संरक्षण आणि रक्षण करण्यासाठी त्यांच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम प्रयत्न करतील. ते स्वतःला सेवेसाठी समर्पित करतील, अशी अपेक्षाही दमानिया यांनी व्यक्त केली आहे.