Anitha Vanglapudi : तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी (12 जून) चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, आता त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करत खातेवाटप देखील केले आहे. चंद्राबाबू नायडू यांच्यानंतर जनसेना प्रमुख आणि अभिनेता पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, चंद्रबाबू यांच्या मंत्रिमंडळातील महत्वाची बाब म्हणजे त्यांनी गृहखात्याची जबाबदारी महिलेवर सोपवली आहे. अनिथा वंगलाडींनी गृहखात्याचा पदभार स्वीकारला आहे.
कोण आहेत अनिथा वंगलाडी?
अनकापल्ले जिल्ह्यातील पायकाराओपेट या विधानसभा मतदारसंघातून अनिथा वंगलाडी निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे विशाखापट्टणम जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघातून एकमेव आमदार आहेत, ज्या मंत्री बनल्या आहेत. अनिथा यांनी निवडणुकीत 120,042 मते मिळवून मोठा विजय मिळवला, त्यांच्या प्रतिस्पर्धी, YSRC च्या कंबाला जोगुलु यांना 76,315 मते मिळाली. त्यामुळे अनिथा यांनी जवळपास 45 हजार मतांनी विजय मिळवलाय. राजकारणात रुची असल्यामुळे त्यांनी वयाच्या 34 व्या वर्षी नोकरीचा राजीनामा दिला आणि राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. त्यांचा राजकीय प्रवास 2012 मध्ये गावपातळीपासून सुरू झाला, जिथे त्यांच्या वक्तृत्व कौशल्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले. टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी प्रोत्साहन दिल्याने त्यांना 2014 च्या निवडणुकीत पायकारावपेट येथून आमदार म्हणून लढण्याची संधी देण्यात आली. त्यांनी YSRC उमेदवार चेंगला वेंकट राव यांच्यावर 2,828 मतांच्या फरकाने विजय मिळवला.
राज्यातील गांजा तस्करांविरोधात कठोर कारवाई करणार
दरम्यान, गृह खाताच्या पदभार स्वीकारताच अनिथा वंगलाडी यांनी मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याचे म्हटले आहे. शिवाय त्यांनी राज्यातील गांजा तस्करांविरोधात कठोर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. महिलांवरील हिंसाचार हे भय निर्माण करण्याचे साधन आहे आणि त्यावर कठोरपणे लक्ष दिले पाहिजे. महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यासाठी टीडीपी सरकार महिला संघटनांचा सल्ला घेईल, असे वंगलाडी यांनी सांगितले आहे.
पोलीस अधिकाऱ्यांवर पक्षपाती कारवाई करणार नाही
दरम्यान, अनिथा वंगलाडींनी यांनी यावेळी पदभार स्वीकारताना वायएसआर काँग्रेस पक्षावर टीका केली. दिशा कायद्याच्या अंमलबजावणीवरुन त्यांनी निशाणा साधलाय. आमचे सरकार पोलीस अधिकाऱ्यांवर पक्षपाती कारवाई करणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. लोकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी त्यांनी व्यक्त केली. पोलिस अधिकाऱ्यांना कायद्याने लोकांसाठी काम करण्याचा सल्लाही अनिथा वंगलाडी यांनी दिला आहे. TDP सरकार पगार आणि थकबाकीशी संबंधित सर्व समस्या सोडवेल. पोलीस खात्यात सुधारणा करण्याच्या योजनांबद्दलही त्यांनी भाष्य केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Vishal Patil on Majha Katta : उद्धव ठाकरे फुटलेल्या 40 आमदारांना भेट देत नव्हते, पण चंद्रहार पाटलांना भेटून उमेदवारी जाहीर झाली : विशाल पाटील