Amit Satam : राजकारणासाठी मराठी, स्वतःच्या कुटुंबाकरिता इंग्रजी व इतर विदेशी भाषा? भाजपच्या अमित साटम यांचा सवाल, ठाकरेंचं नाव न घेता टीकास्त्र
Amit Satam : भाजप आमदार अमित साटम यांनी हिंदी पहिलीपासून शिकवण्याच्या निर्णयाविरोधात मोर्चा काढणाऱ्यांवर नाव न घेता टीका केली आहे.

मुंबई : राज्य सरकारच्या पहिलीपासून मराठी, इंग्रजीसोबत हिंदी विषय शिकवण्याच्या निर्णयाच्या समर्थनार्थ आता भाजप नेते देखील सरसावल्याचं पाहायला मिळतं. भाजपच्या विविध नेत्यांकडून हिंदी भाषा शिकवण्याला विरोध करणाऱ्यांना उत्तर देणं सुरु करण्यात आलं आहे. आशिष शेलार, प्रसाद लाड यांच्यानंतर आता आमदार अमित साटम यांनी देखील त्यांची भूमिका मांडली आहे. अमित साटम यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं थेट नाव घेतलं नसलं तरी त्यांच्या टीकेचा रोख त्यांच्याकडेच दिसून येतो. भाजप आमदार अमित साटम यांनी राजकारणासाठी मराठी, स्वतःच्या कुटुंबाकरिता इंग्रजी व इतर विदेशी भाषा असा टोला लगावला आहे.
भाजपचे आमदार अमित साटम काय म्हणाले?
सरकारनं वारंवार स्पष्टीकरण देऊनही कोणत्याही प्रकारची हिंदीची सक्ती नाही. तरीही मराठीच्या नावावर जे राजकारण करत आहेत. त्यांचं स्वतःचं संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता जे राजकारण करत आहेत त्यांना माझा एकच सवाल आहे. राजकारणासाठी मराठी, स्वत:च्या कुटुंबीयांकरता इंग्रजी आणि इतर विदेशी भाषा असं का केलं जातंय.
अमित साटम पुढं म्हणाले की, सामान्य मराठी माणूस यांना सवाल करत आहे, तुमची मुलं कोणत्या माध्यमाच्या शाळेत शिकली. त्यांनी शाळेमध्ये तसेच कॉलेजमध्ये असताना मराठीला सोडून कोणत्या कोणत्या विदेशी भाषा निवडल्या होत्या? या सवालाचा जवाब पहिला त्यांनी द्यावा नंतर मराठीच्या नावावर राजकारण करावं,असा टोला अमित साटम यांनी लगावला.
ठाकरेंच्या शिवसेनेनंतर मनसेकडून काँग्रेसला संपर्क
महाराष्ट्रात पहिलीपासून त्रिभाषा सूत्र राबवताना हिंदी भाषेला सर्वसाधारण भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या निर्णयाविरोधात 5 जुलै रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय राज ठाकरेंनी जाहीर केला होता. यानंतर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासोबत संवाद साधला. यानंतर आज संजय राऊत यांनी महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, अशी माहिती दिली. 5 जुलै रोजीच्या मोर्चात राज ठाकरे, उद्धव ठाकरे सहभागी होतील. याशिवाय मनसेच्या बाळा नांदगावकर यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती आहे. दोन्ही ठाकरे एकत्र येत पहिली पासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला विरोध करत आहेत. यावर भाजप नेत्यांकडून देखील प्रतिक्रिया येत आहेत.
दरम्यान, 5 जुलै रोजी काढण्यात येत असलेल्या मोर्चाची वेळ आणि मार्ग अद्याप निश्चित झालेला नाही. संजय राऊतांच्या पोस्टनंतर दुपारी मनसेचे संदीप देशपांडे आणि ठाकरेंच्या सेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांची दादर येथे भेट झाली.
























