मुंबई : महायुतीमध्ये (Mahayti) अनेक जागांवरील तिढा अद्याप कायम आहे. हाच तिढा सोडवण्यासाठी महायुतीच्या घटकपक्षांच्या मॅरेथॉन बैठका चालू आहेत. दुसरीकडे शीर्षस्थ नेते नाराज नेत्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहे. जास्तीत जास्त जागा पदरात कशा पाडून घेता येतील, यासाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांकडून प्रयत्न केला जातोय. दरम्यान, महायुतीमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या (Shivsena) हातातून अमरावती (Amravati) आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri- Sindhudurg) या दोन महत्त्वाच्या जागा निसटल्या आहेत. 


अमरावती जागेवर शिवसेनेचा दावा, पण..


महायुतीमध्ये अमरावती जागेवर शिंदे यांच्या शिवसेनेने दावा सांगितला होता. गेल्या अनेक वर्षांपासून शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते आनंदराव अडसूळ या जागेसाठी तयारी करत होते. ही जागा आमची आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे मोठे प्राबल्य आहे. त्यामुळे काहीही झालं तरी येथून शिवसेनेचाच उमेदवार उभा राहील, असे अडसूळ सांगत होते. मात्र आता ऐनवळी ही जागा भाजपाला देण्यात आली असून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना या जागेसाठी तिकीट देण्यात आले आहे. त्यांनी नुकताच भाजपत प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नवनीत राणा आणि आनंदराव अडसूळ हे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. मात्र आता ही जागा भाजपला सुटली असून अडसूळ यांना नवनीत राणा यांचा प्रचार करावा लागणार आहे. शिवसेनेच्या हातातून अमरावतीसारखी महत्त्वाची जागा निसटली आहे. 


नारायण राणे यांना संधी मिळणार?


दुसरीकडे कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेवरही शिवसेनेने दावा सांगितला होता. काहीही झालं तरी आम्ही ही जागा सोडणार नाही, अशी येथील नेत्यांची भूमिका होती. मात्र आता या जागेबाबत नवे वृत्त समोर येत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागा अखेर भाजपच्या वाट्याला आल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या जागेवरून केंद्रीय मंत्री तथा भाजपचे नेते नारायण राणे हे निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसे झाल्यास येथे भाजप विरुद्ध ठाकरे यांची शिवसेना असा सामना रंगणार आहे. राणे यांच्या उमेदवारीची आज (28 मार्च) घोषणा होण्याची शक्यता आहे. 


राणे-उदय सामंत यांच्यात बैठक


शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते किरण सामंत हे या जागेवरून निवडणूक लढवण्यास उत्सूक आहेत. तशी तयारीदेखील सामंत यांनी चालू केली आहे. याच कारणामुळे या जागेवरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात वाद चालू आहे. हा वाद मिटवण्याचा दोन्ही बाजूने प्रयत्न चालू आहे. या मतदारसंघाचा तिढा सोडवण्यासाठी नारायण राणे आणि मंत्री तथा शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली होती. मात्र या बैठकीत ठोस काही मसोर आले नव्हते. त्यानंतर आता ही जागा भाजपच्याच वाट्याला येणार असल्याचे समोर येत आहे. तसे झाल्यास येथून नारायण राणे निवडणूक लढू शकतात. 


म्हणजेच सिंधुदुर्ग आणि अमरावतीच्या रुपात शिंदेंच्या शिवसेनेला फटका बसला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.