पुणे: सध्या लोकसभा निवडणुकीमुळे राज्यात नवनवीन राजकीय समीकरणे आकाराला येताना दिसत आहेत. पक्षांतर, नवीन युती-आघाड्या आणि धक्कातंत्र असे अनेक राजकीय डावपेच रोज खेळले जात आहेत. या सगळ्यात बुधवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला. बुधवारी संध्याकाळी पुण्यातील कोंढव्यामध्ये माजी आमदार महादेव बाबर यांच्या मुलाचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला राजकीय वर्तुळातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात अनेक बडे नेते उपस्थित असले तरी शरद पवार (Sharad Pawar) आणि विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. गेल्या काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Loksabha) रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीवरुन मोहिते-पाटील घराणे नाराज आहे. मात्र, भाजप या नाराजीला फारशी किंमत देत नसल्याने मोहिते-पाटील शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा बुधवारी सकाळपासून रंगली होती. त्यामुळे पुण्यातील लग्नसोहळ्यात झालेल्या शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.


या लग्नसोहळ्याला शरद पवार, संजय राऊत, श्रीनिवास पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक बडे राजकीय नेते उपस्थित होते. लग्नसोहळ्याच्या ठिकाणी हे सर्व नेते बसले असताना विजयसिंह मोहिते-पाटील यांचे आगमन झाले. विजयसिंह मोहिते पाटील व्हीलचेअरवरुन याठिकाणी आले. तेव्हा शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये असलेली खुर्ची रिकामी होती. विजयसिंह मोहिते पाटील त्याठिकाणी येताच कोणीतरी चपळाई दाखवत शरद पवार यांच्या बाजूची रिकामी खुर्ची काढली. त्यानंतर या मोकळ्या जागेत विजयसिंह मोहिते-पाटील यांची व्हीलचेअर ठेवण्यात आली. मोहिते-पाटील यांची व्हीलचेअर मागे घेत असताना शरद पवार यांनीही मदत केली. विजयसिंह मोहिते-पाटील स्थानापन्न झाल्यानंतर शरद पवार त्यांच्याशी हस्तांदोलन केले. यावेळी दोन्ही नेते एकमेकांकडे पाहून हसले. काहीवेळ पवार आणि मोहिते-पाटील एकमेकांच्या बाजूला बसून होते. दरम्यानच्या काळात दोघांमध्ये मोघम संवादही झाला. या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांची ही भेट माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणिते बदलणारी ठरु शकते.


विजयसिंह मोहिते पाटील तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच?


विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहेत. शरद पवार यांनी 1999 साली काँग्रेसची साथ सोडून वेगळा पक्ष काढल्यापासून विजयसिंह मोहिते पाटील त्यांच्यासोबत होते. परंतु,   2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोहिते-पाटील गटाने भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटलांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली होती. मात्र, विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नव्हता. एका जाहीर कार्यक्रमात आपण अजूनही राष्ट्रवादीतच आहोत, राष्ट्रवादी सोडली नसल्याचे विजयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले होते.


आणखी वाचा


सकाळची ती चर्चा संध्याकाळी खरी ठरली, विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार लग्नसमारंभात एकत्र दिसले अन्...