मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) अजित पवारांना (Ajit Pawar) लिहिलेल्या पत्रावर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांनी हे पत्र सार्वजनिक करायची गरज नव्हती. त्यांनी वयक्तिक रित्या अजितदादांना सांगायला हवं होतं, असं यावेळी अमोल मिटकरी यांनी म्हटलं. तसेच महायुतीत बिघाड होणार नाही याची काळजी आपण सर्वांनीच घ्यायला हवी अशी प्रतिक्रिया देखील यावेळी अमोल मिटकरी यांनी दिली.  दरम्यान नवाब मलिकांना (Nawab Malik) सत्तेत सामील करुन न घेण्याचं पत्र देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना लिहिलं आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एक खळबळ माजली. 


नवाब मलिक कोणाच्या बाजूने हा प्रश्न राज्यात मागील अनेक दिवसांपासून सुरु होता. परंतु हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलित सत्ताधारी पक्षाच्या बाजूने जाऊन बसले आणि त्यांचा पाठिंबा कोणाला हे स्पष्ट झालं. त्यांच्या या निर्णयामुळे अधिवेशानाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. 


तर हा विषयच आला नसता - अमोल मिटकरी 


विधान परिषदेत नवाब मलिक यांचा प्रश्न निघाल्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहिलं. मुळात हे पत्र सार्वजनिक करण्याची गरज नव्हती. त्यांनी अधिवेशन संपल्यानंतर जर अजित पवार यांना सांगितला असता तर नवाब मलिक हा विषय आलाच नसता. महायुतीत बिघाड होणार नाही, याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी. त्याबाबच चिंतन देखील करायला हवं, अशी प्रतिक्रिया यावेळी अमोल मिटकरांनी दिली. 


देवेंद्र फडणवीसांची भूमिका तीच सरकारची भूमिका - दरेकर


 हा कोणत्याही प्रकारच दवाब नसून ही भाजप पक्षाची भूमिका असल्याचं प्रवीण दरेकरांनी स्पष्ट केलं. फडणवीसांच्या पुढाकाराने हे सरकार सत्तेत आलं आहे, त्यामुळे त्यांची भूमिका हीच सरकारची भूमिका असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिली. अजित पवारांचं निर्दोषत्व मिळालं, पण नवाब मलिकांचं तसं नाही. ते सध्या आरोग्याच्या कारणास्तव बाहेर आहेत. त्यांच्यावरचे आरोप खोटे आहेत, हे सिद्ध झालं की त्यांचं आम्ही सरकारमध्ये स्वागत करुच, असं प्रविण दरेकरांनी म्हटलं. 


हे सगळं षडयंत्र असल्याची शंका - सुप्रिया सुळे


देवेंद्र फडणवीस हे पत्र न लिहिता अजित पवारांना फोन करुनही सांगू शकत होते. त्यामुळे हे सगळं षडयंत्र असल्याची शंका येत असल्याची प्रतिक्रिया यावेळी सुप्रिया सुळेंनी दिली.  राष्ट्रवादीचे नेते जेलमध्ये होते तेव्हा मी सर्वांना भेटले. अडचणीच्या काळात सोबत राहावं लागतं. प्रत्येक वेळी आम्ही त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या सोबत होतो. नवाब मलिकांवर माझा पूर्ण विश्वास असून त्यांच्या मागे सुप्रिया सुळे पूर्ण ताकदीने उभी राहिल, असा विश्वास देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केला. 


हेही वाचा :


Supriya Sule : देवेंद्र फडणवीस पत्र न लिहिता अजित पवारांना फोन करुनही सांगू शकत होते, सुप्रिया सुळे थेटच म्हणाल्या