नागपूर : दिशा सालियन प्रकरणात ( Disha salian case) एसआयटी (SIT) चौकशी स्थापन करण्यात आलीये. यावर ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी थेट निशाणा साधलाय. दिशा सालियन प्रकरणात एसआयटी चौकशी करणं म्हणजे शिळ्या कढीला ऊत अशा जळजळीत शब्दांत अनिल परब यांनी टीकास्त्र सोडलं. दिशा सालियन प्रकरणांमध्ये मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) संपूर्ण चौकशी केली असून त्याचा क्लोजर रिपोर्ट देखील सादर केला त्यामुळे ती केस पूर्णपणे बंद झाली होती. मात्र आता खास अधिवेशनात अशाप्रकारे एसआयटीची चौकशी सुरु झाल्याचं यावेळी अनिल परबांनी म्हटलं. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंची (Aaditya Thackeray) चौकशी केली जाणार असल्यामुळे आता ठाकरे गट आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळतंय. 


दिशा सालियान मृत्यू प्रकरणानं राज्याच्या राजाकारणात गेल्या अनेक दिवसांपासून गोंधळ उडाला आहे. भाजप आमदारांकडून सातत्यानं याप्रकरणावरुन आदित्य ठाकरेंवर आरोप केले जात आहेत. अशातच शिवसेनेतील अंतर्गत फुटीनंतर पक्ष दोन गटांत विभागला गेला आणि ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या सर्व निकटवर्तीयांनी आदित्य ठाकरेंना दिशा सालियान प्रकरणावरुन घेरण्यास सुरुवात केली. अशातच आता याप्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी केली जाणार आहे. 


हे आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याचं काम - अनिल परब


हे आदित्य ठाकरेंनी बदनाम करण्याचं काम सुरु आहे. मात्र असं जरी असलं तरी आम्ही मुद्दे उचलत राहणार आणि राज्य सरकारला राज्यातील प्रश्न देखील विचारत राहणार. अशाप्रकारे चौकशी लावून त्यांना वाटत असेल की पक्ष खेचून आणला जातो पण असं होणार नाही, असं म्हणत अनिल परबांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. पुढे त्यांनी म्हटलं की, जेव्हा ही घटना घडली, त्यावेळी कोण कुठे होतं, या सगळ्याचा तपास मुंबई पोलिसांनी आधीच केला आहे. त्यांच्याकडे सगळे रिपोर्ट आहेत. सीबीआयला देखील सगळा तपास करायला सांगितला होता. त्यानंतर आता एसआयटी स्थापन होतेय, तरी देखील यातून काही निष्पन्न होणार नाही. 


दिशा सालियान कोण?


दिशा सालियान दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची मॅनेजर होती. 8 जून 2020 ला मुंबईमध्ये घराच्या बालकनीमधून खाली पडून दिशा सालियानचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येची नोंद केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूपूर्वी दिशानं आपल्या लंडनमधील एका मैत्रिणीला फोन केला होता. आपल्या मैत्रिणीशी बोलताना दिशा थोडी चिंतेत वाटत होती. वर्कलोड जास्त असल्याचं तिनं आपल्या मैत्रिणीला सांगितलं होतं. त्यानंतर थोड्याचवेळात तिचा होणारा नवरा रोहन यानं दिशा ज्या खोलीत राहात होती, त्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र दिशा त्या खोलीमध्ये नव्हती. त्यानं खिडकीतून खाली पाहिलं, तेव्हा त्याला दिशा बालकनीतून खाली पडलेली दिसली.


हेही वाचा :


Disha Salian Case: बाल्कनीतून पडून मृत्यू, तरीही राजकारण पेटलं, देश गाजवणारं दिशा सालियान मृत्यू प्रकरण नेमकं काय?