Amol Mitkari on Raj Thackeray : काही दिवसांपूर्वी पुण्यात पावसाने (Pune Rain) थैमान घातले. यामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) टोला लगावला. ते या ठिकाणी नसतानाही धरणातून पाणी वाहिलंय. त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? असे राज ठाकरेंनी म्हटले. आत यावरून राष्ट्रवादी अजित पवार गट चांगलाच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.  अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.  टोल आणि भोंग्याचे आंदोलन फसलेल्या सुपारीबहाद्दरांनी अजित पवारांवर बोलू नये. राज ठाकरेंना एनडीआरएफचा साधा लाँग फॉर्मही सांगता आला नाही म्हणजे राजकारणातील हा सर्वात मोठा जोक आहे, असा टोला अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंना लगावलाय. 


सुपारीबहाद्दरांनी अजित दादांबद्दल बोलू नये


अमोल मिटकरी म्हणाले की, दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित दादांबद्दल सुपारी बहाद्दरांनी बोलू नये. कारण हे सुपारी बहाद्दर टोल नाक्याचे आंदोलन असेल, भोंग्याचे आंदोलन असेल किंवा आणखी कुठले आंदोलन असेल त्यांना जीवनात कुठल्याही आंदोलनाला यश आले नाही. या व्यक्तीची विश्वासार्हता संपली आहे. महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखा आहे, अशी टीका त्यांनी यावेळी राज ठाकरेंवर केली. 


राजकारणातील हा सर्वात मोठा जोक


ते पुढे म्हणाले की, सुपारी बहाद्दर लोकांकडून जनतेने योग्य तो धडा घेतलेला आहे. नव्या नवरीचे नऊ दिवस म्हणून कुठेतरी पुण्यात भेट द्यायची. या व्यक्तीला एनडीआरएफचा साधा लाँग फॉर्मही माहित नाही. तो माणूस आज आपत्ती व्यवस्थापनावर बोलत आहे. म्हणजे राजकारणातील हा सर्वात मोठा जोक आहे, असा टोला अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. 


काय म्हणाले राज ठाकरे? 


दरम्यान, पुण्यातील पूर परिस्थितीवर राज ठाकरे यांनी म्हटले की, राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत, एक तर पुण्यातीलच आहेत. ते या ठिकाणी नसतानाही धरणातून पाणी वाहिलंय. त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? नदीत अनधिकृत बांधकाम झाल्यामुळेच पूरस्थितीची घटना घडली. सरकारने मदत करणे गरजेचे आहे. वाऱ्यावर सोडून चालणार नाही. सरकारकडे टाऊन प्लॅनिंग काही नाही. अचानक जास्त पाणी सोडल्याने ही घटना घडली, घरात पाणी शिरले. कोणत्याही शहरात टाऊन प्लॅनिंग चालवले जात नाही. दिसली जमीन की विक, असेच सुरु आहे. एक पुणे नाही तर पुण्यात पाच पाच शहर झाली आहेत, असे त्यांनी म्हटले. 


आणखी वाचा 


Pune Flood : पुण्यात कमरे इतक्या पाण्यात उतरुन काम, शाबासकी ऐवजी निलंबन, संदीप खलाटेंवरील कारवाईने आश्चर्य!