नवी दिल्ली : नुकत्याच सादर करणाऱ्या अर्थसंकल्पावर बोलताना राहुल गांधी सत्ताधारी मोदी सरकावर सडकून टीका केली. या अर्थसंकल्पातून शेतकरी, कामगार, महिला, छोटे उद्योजक यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. उलट उद्योगविश्वावर एकाधिकारशाही असेलेल्या मोठ्या उद्योजकांच्या फायद्याचे निर्णय घेण्यात आले, असे राहुल गांधी म्हणाले. शेतकऱ्यांना हमीभावाची खात्री देणाऱ्या कायद्यावरही भाष्य करण्यात आले नाही, असे राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, एकीकडे राहुल गांधी यांचे रोखठोक भाषण चालू असताना त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांना ऐकून अर्थमंत्री कधी डोक्याला हात लावत होत्या तर कधी त्यांना हसू फुटलं. त्यानंतर राहुल गांधींनी सीतारामन यांनादेखील लक्ष्य केलं.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी डोक्याला हात का लावला?
अर्थसंकल्पात देशातील सर्व प्रवर्गांना प्रतिनिधित्व मिळालं नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. हा मुद्दा मांडताना त्यांनी संसदेत एक फोटो दाखवला. अर्थसंकल्प सादर करण्याच्या पूर्वसंध्येला अर्थमंत्रालय परिसरात हलवा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाला विरोधक तसेच सत्ताधारी नेत्यांना आमंत्रित केले जाते. याच कार्यक्रमातील फोटो संसदेत दाखवत 'या फोटोत अर्थमंत्रालयाचे काही अधिकारी दिसत आहेत. फोटोमध्ये बजेटचा हलवा वाटला जात असल्याचं दिसतंय. या अधिकाऱ्यांत एकही ओबीसी अधिकारी नाही, एकही दलित अधिकारी नाही, एकही दलित अधिकारी नाही. देशात हे काय चाललंय. देशाचा हलवा वाटला जातोय आणि यामध्ये देशातील 73 टक्के जनतेचे प्रतिनिधीत्व करणारे प्रतिनिधीच नाहीयेत," असा दावा राहुल गांधी यांनी केला.
95 टक्के जनतेला जातिनिहाय जनगणना हवी
तसेच, "सगळा हलवा हेच खात आहेत. 20 अधिकाऱ्यांनी अर्थसंकल्प तयार केला. माझ्याकडे त्यांची नावे आहेत. म्हणजेच भारताचा हलवा वाटण्याचं काम या 20 लोकांनी केलंय. पण या 20 पैकी फक्त एक अधिकारी अल्पसंख्याक तर एक ओबीसी अधिकारी आहे. या फोटोमध्ये तर एकही अधिकारी नाही. म्हणजेच फोटो काढताना तुम्ही त्या दोन अधिकाऱ्यांना मागे ढकललं. म्हणूनच अर्थसंकल्पात जातिनिहाय जनगणनेचा मुद्दा यावा असे मला वाटत होते. देशातले 95 टक्के भारतीय लोकांना जातीनिहाय जनगणना हवी आहे. कारण या लोकांना आमची भागिदारी किती आहे, हिस्सेदारी किती आहे, हे जाणून घ्यायचं आहे," अशी रोखठोक भूमिका राहुल गांधी यांनी मांडली.
अर्थमंत्री हसत आहेत, ही हसण्याची बाब नाही
राहुल गांधी यांनी ही भूमिका मांडल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना हसू आले. हीच बाब लक्षात घेऊन राहुल गांधी यांनी सीतारामन यांच्यावरही टीका केली. 'अर्थमंत्री हसत आहेत. आश्चर्याची गोष्ट आहे. ही हसण्याची बाब नाही. मी जातीनिहाय जनगणनेवर बोलत आहे. जातिनिहाय जनगणना केली तर देशात बदल घडेल,' असे राहुल गांधी निर्मला सितारान यांना उद्देशून म्हणाल्या. राहुल गांधी यांच्या प्रतिक्रियेनंतर निर्मला सीतारामन यांनीदेखील होकारार्थी मान हलवली.
आम्ही हमीभावाचा कायदा करू
दरम्यान, आम्ही सत्तेत आल्यास जातीआधारित जनगणना करू. आमचे इंडिया सरकार जेव्हा सत्तेत येईल तेव्हा याच संसदेच्या पटलावर आम्ही शेतकऱ्यांना हमीभावाची हमी देणारा कायदा संसदेत संमत करून दाखवू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.
हेही वाचा :
"मोदी सरकारने जनतेच्या पाठीत अन् छातीत सुरा खुपसला," अर्थसंकल्पातील तरतुदींवरून राहुल गांधी आक्रमक!