Amol Kolhe: आढळराव विरोधकांवर टीका करायला गेले पण श्रीकांत शिंदेही ओढले गेले, चूक हेरत अमोल कोल्हेंनी डाव उलटवला, म्हणाले...

Maharashtra Politics: आढळराव पाटलांनी विरोधकांवर सोडलेल्या वाग्बाणामुळे त्यांचे मित्रपक्षच अधिक घायाळ झाले आहेत. संसदरत्न पुरस्काराच्या मुद्द्यावरुन आढळरावांनी अमोल कोल्हेंना लक्ष्य केले. पण या टीकेच्या भोवऱ्यात श्रीकांत शिंदे ओढले गेले.

Continues below advertisement

शिरुर: शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरुरमधून लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी मंगळवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमात भाषण करताना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी संसदरत्न किताब पटकावणाऱ्या अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर निशाणा साधला. संसदरत्न पुरस्कार म्हणजे फसेविगिरी असते. या पुरस्कारांना काही अर्थ नसतो, अशा आशयाचे वक्तव्य आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी केले. आढळरावांनी हे वक्तव्य अमोल कोल्हे यांना डिवचण्यासाठी केले होते. परंतु, हे वक्तव्य करताना आढळराव पाटील यांना एका गोष्टीचे भान राहिले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनाही यंदा संसदरत्न हा पुरस्कार जाहीर झाला होता. त्यामुळे आढळराव पाटील यांनी या पुरस्कारावरुन बारणे आणि कोल्हेंना टोला लगावला असला तरी त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना मिळालेला संसदरत्न पुरस्कारही फिक्सिंगचा प्रकार होता का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. त्यामुळे आढळराव पाटील यांच्या या वाग्बाणामुळे विरोधकांपेक्षा मित्रपक्षच अधिक घायाळ झाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Continues below advertisement

अमोल कोल्हे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत याच मुद्द्यावरुन शिवाजीराव आढळराव पाटील यांची कोंडी केली. खासदारांना देण्यात येणाऱ्या संसदरत्न पुरस्कारांना काही अर्थ नसतो, ते चेन्नईत बसवून ठरवले जातात, असे आढळराव पाटील यांचे म्हणणे आहे.  पण ए पी जे अब्दुल कलाम साहेबांनी खासदारांना संसदरत्न पुरस्कार देण्याची सुरुवात केली. कोणत्याही संस्थेने या पुरस्कारांची सुरुवात केली नव्हती. त्यामुळे या पुरस्काराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य गोष्ट नाही. श्रीकांत शिंदे यांनाही संसदरत्न पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे तु्म्ही त्यांच्याबाबतही असंच बोलणार का, असा सवाल अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.

मी माझ्या काकांच्या कृपेने डॉक्टर झालेलो नाही, अमोल कोल्हेंचा अजितदादांना टोला

अजित पवार यांनी शिरुरमधील भाषणात अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली होती. अमोल कोल्हे यांना राजकारणापेक्षा मनोरंजन क्षेत्रातच जास्त रस आहे. राजकारण हा त्यांचा पिंड नाही, असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना अमोल कोल्हे यांनी म्हटले की, माझा काका कोणी फार मोठा अभिनेता आहे म्हणून मला बोटाला धरुन आणलं आणि अभिनेता केलं, असे झालेले नाही. मी स्वत:च्या कष्टाने हे सगळं केलं. मी MBBS डॉक्टर झालो ते माझा काका कोणीतरी डॉक्टर होता म्हणून मला एमबीबीएसची सीट मिळाली, असे झाले नाही. मी स्वत:च्या कष्टाने डॉक्टर झालो. या सगळ्या शिक्षणानंतरही मला सहजपणे टार्गेट केले जाते. माझा राजकारणाचा पिंड नाही, असे अजित पवार म्हणतात. याचा अर्थ नेमका काय? माझं भ्रष्टाचारात नाव आलं नाही, म्हणजे माझा राजकारणाचा पिंड नाही का? आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी किंवा काका राजकारणात नसलेल्या मुलांनी राजकारण किंवा समाजकारणात यायचेच नाही का?, असा सवाल अमोल कोल्हे यांनी विचारला. मी संसदरत्न पुरस्कार माझ्या लोकसभेतील कामगिरीच्या जोरावर मिळवला. मी सेलिब्रिटी आहे म्हणून मला तो पुरस्कार मिळालेला नाही, असेही अमोल कोल्हे यांनी सांगितले.

आणखी वाचा

संसदरत्न पुरस्कार म्हणजे फसवेगिरी, आमच्या श्रीरंग बारणेंना 8 वेळा मिळालाय, हातात घड्याळ बांधताच आढळराव पाटलांची फटकेबाजी

 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola