Maharashtra Honey Trap news: राज्यातील तब्बल 72 वरिष्ठ सरकारी आणि अधिकारी हनी ट्रॅपच्या (Honey Trap) जाळ्यात अडकल्याची खळबळजनक माहिती नुकतीच समोर आली होती. या अधिकारी आणि माजी मंत्र्यांची नावे सरकारकडून गोपनीय ठेवण्यात आली आहेत. हा तपासही गोपनीय पद्धतीने सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

या माहितीनुसार, राज्यातील सात क्लास वन प्रशासकीय अधिकारी, सनदी अधिकारी आणि आजी-माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील ठाणे गुन्हे शाखेकडे एकूण तीन तक्रारी आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. या तीनही तक्रारींची गोपनीय चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू आहे. नाशिकमधील एक वरिष्ठ अधिकारी, नवी मुंबईतील एक व्यक्ती आणि ठाण्यातील एका बड्या व्यक्तीने या तक्रारी केल्याचे समजते. 

या तिन्ही तक्रारींमध्ये गंभीर स्वरुपांचे आरोप असून उच्चस्तरीय गोपनीय चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा तपास करताना  ओळख सार्वजनिक करु नये, असे तक्रारदारांचे मत असल्याने अधिकाऱ्यांची नावे गोपनीय ठेवून अशा प्रकरणाचा तपास केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे गुन्हे शाखेकडे तीन तक्रारी प्राप्त झाल्या असल्या तरी अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

Thane Police Honey Trap: आमची ओळख गुप्त ठेवा, अधिकाऱ्यांची पोलिसांकडे मागणी

ठाणे पोलिस दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जे प्रशासकीय अधिकारी हे हनीट्रॅपमध्ये अडकले जातात त्यांच्या तक्रारी आमच्याकडे येतात. या प्रकरणाचा तपास करताना आमची ओळख ही सार्वजनिक करू नका असे तक्रारदारांनी सांगितले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांची नावं गोपनीय ठेवून अशा प्रकरणांचा तपास केला जातो. यासंदर्भात ठाणे गुन्हे शाखेकडे तक्रारी प्राप्त झाल्यास त्याची गोपनीय चौकशी केली जाते. अद्याप तरी हनीट्रॅपबाबत कुठलाही गुन्हा ठाणे गुन्हे शाखेकडे दाखल नसल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Nashik News: महिलेने पोलिसांत तक्रार केल्यामुळे व्हिडीओंची माहिती समोर

नाशिकच्या दौऱ्यावर असलेल्या एका राजकीय नेत्याने अनौपचारिक गप्पांदरम्यान या प्रकाराबाबत पत्रकारांना सांगितले. संबंधित नेत्याने पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकलेल्यांमध्ये नाशिकमधील एका बड्या अधिकाऱ्याचाही समावेश आहे. हे व्हिडीओ हनी ट्रॅपचा भाग आहेत की वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या रासलीला आहेत, याबाबत नेमकी स्पष्टता नाही. मात्र, या राजकीय नेत्याच्या गौप्यस्फोटानंतर नाशिकच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. नाशिकच्या एका पंचतारांकित सुविधा असलेल्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे. नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात याबाबत एका महिलेने तक्रार  केली होती. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचे व्हिडिओ असल्याने कोणीही अधिकारी आपल्या हनीट्रॅपबाबत समोर येत नसल्याने हे प्रकरण अद्याप गुलदस्त्यात आहे.   

आणखी वाचा

राज्यातील 72 वरिष्ठ अधिकारी, माजी मंत्री हनी ट्रॅपच्या जाळ्यात? महिलेचा व्हिडीओबाबत खळबळजनक दावा