पुणे: देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह हे दोघेही एकसारखंच अघळपघळ बोलतात. देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील अधिवेशनात ज्याप्रकारे भूमिका मांडली ते पाहता फडणवीस (Devendra Fadnavis) हेच फेक नरेटिव्हचे सर्वात मोठे केंद्र असल्यासारखे वाटतात, अशी टिप्पणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली. अमित शाह (Amit Shah) आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यांच्या सगळ्या आरोपांना सुषमा अंधारे यांनी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत प्रत्युत्तर दिले.
भाजप पक्ष कायमच हिंसा करतो. इथला हिंदू हिंसक नाही. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणजे सकल हिंदू अशी भाजपची समजूत आहे. राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजाला भाजप का खेळवत आहे? राज्यात जातीय विषपेरणी करू नका,आरक्षणाचा तोडगा काढा. दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरु आहे. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी लोकसभेत मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मांडावा. तुमची नियत मराठा समाजाला कळू द्या, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.
तडीपार लोकांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये: सुषमा अंधारे
अमित शाह यांनी भाजपच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांचा उल्लेख औरंगजेब फॅन्स क्लबचे अध्यक्ष असा केला होता. त्याला उत्तर देताना सुषमा अंधारे यांनी म्हटले की, आम्हाला अमित शाह यांच्यावर बोलायचे नाही. तडीपार लोकांनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला शहाणपणा सांगण्याची गरज नाही. आम्ही कोण आहोत, आम्ही काय आहोत? याचं सर्टिफिकेट गुजरातच्या तडीपार माणसाकडून घेण्याची गरज वाटत नाही. आमचं सर्टिफिकेट गुजरातच्या तडीपराकडून घेण्याची वाईट वेळ आलेली नाही. ज्यांच्या हातावर जस्टिस लोया यांच्या खुनाचे डाग आहेत, त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट देऊ नये, , अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
शंकराचार्य मातोश्रीवर आल्यापासून तुम्हाला पोटशुल उठलं आहे. तुम्हाला आता मुद्दे मिळत नाहीत. अदानींच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली तेव्हा तुमची आर्थिक रसद तुटते का? असं वाटायला लागलं म्हणून औरंगजेब फॅन क्लब अशी भाषण करत आहात, तुमचा स्तर किती खाली गेला आहे, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना विरोधी बाकावर बसण्यासाठी शुभेच्छा: सुषमा अंधारे
सुषमा अंधारे यांनी खोचक शैलीत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या दोघांची जन्म तारीख १ एप्रिल असावी, त्यांच्या वागण्यातून ते दिसतं. फडणवीस गृहमंत्री आहे की ठोक मंत्री आहेत. कुंपणच शेत खात असेल तर कसं होणार, असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
आणखी वाचा