Amit Shah Meeting On Maharashtra CM: राज्याच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात काल (28 नोव्हेंबर) रात्री दिल्लीमध्ये अमित शाहांच्या निवासस्थानी बैठक झाली. अमित शाह (Amit Shah), एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. बैठकीमध्ये मुख्यमंत्रिपदासह खातेवाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान आज मुंबईत महायुतीची बैठक होणार आहे. शिंदे, फडणवीस, अजित पवार या बैठकीला उपस्थित असतील. अमित शाहांनी दिलेल्या सूचना आणि निर्णयांबद्दल बैठकीत चर्चा होणार आहे.  तर येत्या दोन दिवसांत निरीक्षक महाराष्ट्रात येणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे लवकरच स्पष्ट होईल. 


बैठकीत काय काय घडलं?


एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल काल अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले होते. या बैठकीत मुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाली. रात्री सुमारे दोन तास अमित शाहांच्या निवासस्थानी चर्चा झाली. यानंतर दोन दिवसांत निरीक्षक महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती समोर आली. तसेच उपमुख्यमंत्रिपदाबाबत कालच्या बैठकीत कोणताही निर्णय नाही झालेला नाही. 


बैठकीत एकनाथ शिंदेंनी कोणती भूमिका मांडली?


काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समोर शिवसेनेची भूमिका मांडली. एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून 12 मंत्रिपदांची अमित शाह यांच्याकडे मागणीसोबतच विधान परिषदेच्या सभापती पदाची देखील मागणी करण्यात आली. मंत्रिपदात गृह, नगरविकास यासह महत्त्वाच्या खात्यांची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. पालकमंत्री पद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा, अशी एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांना विनंती केली.  तसेच महायुती म्हणून शिवसेना सोबत आहे, असा विश्वान एकनाथ शिंदेंनी पुन्हा अमित शाह यांना बैठकीत दिला. 


आज मुंबईत पुन्हा बैठक-


देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत महायुतीची आज मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत अमित शाहांनी दिलेल्या सूचना आणि निर्णयांबाबत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, शाहांसोबतची बैठक सकारात्मक झाली. येत्या २ दिवसांत निर्णय होईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर दिली. तर कोणतीही नाराजी नाही, आम्ही तिघे एकत्र काम करणार, अशी प्रतिक्रिया देखील एकनाथ शिंदे यांनी दिली. 



संबंधित बातमी:


भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?