मुंबई : राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली गतिमान झाल्या असून महायुतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची समजूत काढली जात आहे. त्यातच, भाजपचे केंद्रातील वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे, असे एकनाथ शिंदे यांनी गुरुवारीच जाहीर केलं आहे. तर, अजित पवारांनीही भाजपला आमचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे, भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा (Chief Minister) मार्ग मोकळा झाला असून आता उपमुख्यमंत्रीपदी शिवसेना शिंदे गटातून कोणाची वर्णी लागणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच, भाजप मुख्यमंत्र्यांसह गृहंत्रीपद देखील स्वत:कडेच ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे, एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेकडे वजनदार कोणतं खातं राहिलं, याची देखील उत्सुकता शिवसेना आणि महाराष्ट्रातील आमदारांना आहे. दरम्यान, राज्याचं अर्थमंत्रीपद हे अजित पवारांकडेच राहिल, अशी सूत्रांची माहिती आहे.
राज्य सरकार स्थापन होण्याची उत्सुकता सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही लागली असून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनाच संधी मिळेल, असे दिसून येते. तत्पूर्वी, महायुतीमधील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रात प्रत्येकी एक-एक मंत्रीपदही देण्यात येणार असल्याचे समजते. राज्यात महायुतीला 237 जागांवर स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजपने 132 जागांसह मोठी आघाडी घेतली आहे. तर, शिवसेना शिंदे गटाला 57 जागांवर विजय मिळाला असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा जिंकता आल्या आहेत. त्यामुळे, मुख्यमंत्रीपदावर भाजपचा दावा असून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी भाजप नेते व आमदारांची इच्छा आहे. त्यामुळे, महायुतीमधील त्यांच्या घटक पक्षांकडे कोणती खाती जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळात व राजकीय विश्लेषणातून समोर येत आहे.
सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपला 21, त्यापाठोपाठ शिंदे गटाला 12 आणि अजितदादा गटाला 10 मंत्रीपदे मिळणार आहेत. मात्र, या सगळ्यात राज्यात वचक ठेवण्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती कोणाकडे राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रीपदासह गृह खाते हे भाजपकडे राहणार आहे. तसेच सामान्य प्रशासन हेही अत्यंत महत्त्वाचे खाते मुख्यमंत्र्यांकडे म्हणजे भाजपकडे राहिल. तर, अर्थ खातं अजित पवारांना दिले जाणार असून नगरविकास खातं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे असेल, अशी सूत्रांची माहिती आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम आणि महसूल खातं दिलं जाईल. याबाबत आज दिल्लीत होणाऱ्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, सर्वांचे लक्ष आजच्या बैठकीतील निर्णयाकडे लागले आहे. दरम्यान, 2 डिसेंबर रोजी राज्य सरकार स्थापन होऊन मुख्यंत्रीपदाचा शपथविधी सोहळा होईल, अशी माहिती आहे. त्यामुळे, अधिकृतपणे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून किंवा भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहीर होत नाही, तोपर्यंत सर्वांचीच उत्कंठा ताणली आहे.
हेही वाचा
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला