यवतमाळ : देशाचे केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कामाचं विरोधकही कौतुक करतात, तर सोशल मीडियातून (Social Media) नेटीझन्सही त्याच्या कामाला दाद देत असल्याचे पाहायला मिळते. त्यांच्या भाषणातील परखडपणा, स्पष्टवक्तेपणा आणि भविष्याचं व्हिजन तरुणाईला भावतं. देशाच्या विकासासाठी मनापासून समर्पण देणारं नेतृत्त्व म्हणूनही गडकरींकडे पाहिलं जातं. शरद पवारांनंतर देशाच्या राजकारणात महाराष्ट्रातून असलेले एकमेव लोकनेते म्हणजे नितीन गडकरी. त्यामुळेच, भाजपाप्रणित एनडीएकडून गडकरींना पंतप्रधान करावं, अशी चर्चाही सोशल मीडियात होत असते. दूरदृष्टी बाळगणाऱ्या नितीन गडकरींनी आजच्या यवतमाळ (Yavatmal) येथील सभेतून आपल्या कामाची ऊर्जा पुन्हा एकदा देशवासीयांना दाखवून दिली. हरिवंशराय बच्चन यांच्या अग्निपथ कवितेमधील तू न रुकेगा कभी.. तू न थकेगा कभी.. या पंक्ती गडकरींनी खऱ्या करुन दाखवल्या. कारण, भरसभेत भोवळ आल्यानंतरही ते पुन्हा भाषणासाठी माईकसमोर आले अन् उपस्थितांच्या टाळ्या-शिट्ट्यांनी लोकांचे मन जिंकले.
लोकसभा निवडणुकांसाठी दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे, बड्या राजकीय नेत्यांच्या सभांची रेलचेल महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज अमरावतीमध्ये आहेत. तर, राहुल गांधीही अमरावती व सोलापुरातून सभा घेत आहेत. दुसरीकडे नितीन गडकरीही महायुतीच्या उमेदवारांसाठी भर उन्हात प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. नितीन गडकरी नागपूर लोकसभा मतदारसंघातून यंदा हॅटट्रीक साधण्यासाठी लढत आहेत. त्यांच्यासाठी 20 एप्रिल रोजी पहिल्याच टप्प्यात मतदान झाले. मात्र, महायुतीचे वरिष्ठ नेते आणि स्टार प्रचारक म्हणून ते महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेऊन मैदान गाजवत आहेत. दरम्यान, आज यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील सभेत बोलताना व्यासपीठावरच त्यांना भोवळ आली.
नितीन गडकरी पुसदमध्ये भाषणासाठी उभा राहिले होते, त्यावेळी भाषण सुरु असतानाच भरसभेत त्यांना भोवळ आली.त्यामुळे गडकरींचा तोल जात असतानाचा पाठिमागून सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडून आधार दिला. तसेच, स्टेजवरील लोकांनी आणि अंगरक्षकांनी नितीन गडकरी यांना सावरत व्यासापीठावर खाली बसवले. थोडावेळ आराम केल्यानंतर आणि पाणी पिल्यानंतर गडकरींनी पुन्हा आपलं अर्धवट भाषण सुरू केलं आणि उपस्थितांची मने जिंकली. यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या सभेदरम्यान उन्हाच्या तीव्रतेने, अस्वस्थ वाटू लागल्याने गडकरींना भोवळ आली होती. मात्र, ते पुन्हा भाषणाला उभे राहिल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे ते पुढील सभेतही भाषण करणार आहेत.
हरिवंशयराय बच्चन यांच्या अग्निपथ कवितेतील तू न रुकेगा कभी... तू न थकेगा कभी...ओळींप्रमाणे भोवळ आल्यानंतरही गडकरींनी पुन्हा उठून आपलं भाषण पूर्ण केलं. व्यासपीठासमोर उपस्थित असलेल्या हजारो लोकांसमोर आपलं विकासाचं व्हिजन मांडलं. गडकरींची ही ऊर्जाशक्ती आणि कामाप्रतीची समर्पण भावना पाहून उपस्थितांनीही टाळ्या वाजवून दाद दिली.
यापूर्वीही अनेकदा आलीय भोवळ
1. नोव्हेंबर 2022 मध्ये पश्चिम बंगालमध्ये एका कार्यक्रमामध्ये भोवळ आली होती. बंगालमधील सिलिगुडतील दागापूर येथील एका जाहीर कार्यक्रमात गडकरींना भोवळ आली. भाषण सुरू असतानाच त्यांना भोवळ आली होती. त्यांच्यावर तात्काल प्राथमिक उपचार करण्यात आले.
2. 2019 साली शिर्डीतील एका कार्यक्रमामध्ये स्टेजवरच असताना ते कोसळले होते. उष्माघाताने त्यावेळी गडकरींनी भोवळ आल्याचं बोललं जातंय.
3. डिसेंबर 2018 साली राहुरी कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमातही गडकरींना भोवळ आली होती. राष्ट्रगीत झाल्यानंतर खुर्चीवर बसत असताना नितीन गडकरी यांना भोवळ आली होती. रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यानंतर गडकरींना भोवळ आली. नंतर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची तब्येत ठिक झाली.