अहमदनगर : राज्यातील हाय व्होल्टेज लढतींमध्ये अहमदनगरमधील विखे पाटील विरुद्ध निलेश लंके (Nilesh Lanke) या लढतीकडेही महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. अजित पवारांचा (Ajit pawar) विरोध झुगारत आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन निलेश लंकेंनी सुजय विखेंविरुद्ध (Sujay vikhe patil) दंड थोपटले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने निलेश लंकेंनी महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या रणांगणात उतरवले आहे. त्यामुळे, लंके विरुद्ध विखे असा सामना अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात चर्चेचा आणि प्रतिष्ठेचा ठरला आहे. या मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे, या अर्जासोबत आपल्या संपत्तीचं विवरणपत्रही जोडण्यात आलं आहे. त्यानुसार, निलेश लंकेंची संपत्ती सार्वजनिक झाली आहे.


मी सर्वसामान्य माणूस असून लोकांच्या सेवेसाठी राजकारण आलोय, असे निलेश लंके आपल्या भाषणातून सांगतात. त्यामुळे, साहजिकच त्यांची संपत्ती किती, हे जाणून घेण्याची उत्कंठा त्यांच्या मतदारसंघासह राज्यातील इतरही नागरिकांना आहे. लंकेंनी साध्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबत संपत्तीचे विवरणपत्रही जोडले आहे. ''मी आधीपासूनच सांगितलं आहे की, मी समाजासाठी काम करतो. माझ्यावर अनेकदा आरोप झाले की माझी इथे प्रॉपर्टी आहे, तिथे प्रॉपर्टी आहे. मी तर सांगितलं होतं माझी प्रॉपर्टी दाखवा मी उमेदवारी अर्ज देखील भरणार नाही,'' असे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी प्रतिज्ञापत्रातील संपत्तीवर बोलताना म्हटले. निलेश लंके यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती कमी झाल्याचे दिसून येत आहे, विशेष म्हणजे त्यांच्यावरती  संपत्तीच्या तुलनेत कर्ज देखील मोठ्या प्रमाणात आहे. 


निलेश लंकेंची संपत्ती किती


निलेश लंके यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रामध्ये त्यांची एकूण संपत्ती 44 लाख 32 हजार रुपये एवढी असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे या संपत्तीपैकी त्यांच्यावर तब्बल 37 लाख 48 हजार रुपयांचेही कर्ज आहे. समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीला कधीही संपत्तीचा मोह नसतो, मी लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधींनी जनतेची सेवा केली पाहिजे हाच उद्देश ठेवून मी काम करतो आहे, असे लंकेंनी संपत्तीच्या प्रश्नावर बोलताना म्हटले. 


शिवसेना उमेदवाराबद्दल लंके स्पष्टच बोलले


अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून मविआचे उमेदवार निलेश लंके यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. मात्र, मविआमधील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनीही या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने चर्चेला उधाण आलं आहे. एकीकडे महाविकास आघाडीत मित्रपक्ष असलेल्या शिवसेना पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्याने अशी बंडखोरी केल्यामुळे यामागील नेमकं राजकारण काय, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यासंदर्भात बोलताना मविआ उमेदवार निलेश लंके यांनी गिरीष जाधव यांनी आपल्याशी बोलूनच अर्ज भरला असल्याचे म्हंटले आहे. काही तांत्रिक गोष्टी असतात, त्यामुळे त्यांनी मला सांगून अर्ज भरला असून काल मी त्यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात देखील गेलो होतो, त्यामुळे आमच्यात कोणते मतभेद नसल्याचे निलेश लंके यांनी म्हंटले आहे.


सुजय विखेंची संपत्ती किती?


भाजपा महायुतीचे उमेदवार सुजय विखेंच्या संपत्तीत 2019 च्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेत सुमारे 11 कोटी 93 लाख 84 हजार 39 रुपये इतकी वाढ झाल्याचे दिसून येते. या अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रावर उमेदवारांचे मालमत्तेचे विवरण देण्यात आले असून विखेंच्या संपत्तीत 6 कोटी तीन लाख 93 हजार 897 तर स्थावर मालमत्तेमध्ये 5 कोटी 89 लाख 90 हजार 142 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यानुसार, सुजय विखेंची एकूण संपत्ती आता 11 कोटी 93 लाख 84 हजार रुपयांवर पोहोचली आहे.