Ajit Pawar Visited Flood Affected Areas : विरोधी पक्षनेते अजित पवार आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी वर्धा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. अजित पवार यांनी आपल्या दौऱ्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. वर्धा जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दौऱ्यादरम्यान यशोदा नदीच्या पुराने प्रभावित झालेल्या सरूळ गावातील शेतकऱ्यांशी अजित पवार यांनी संवाद साधल. त्यांनी पंचनामे आणि नुकसानीची माहिती घेतली. त्यांनतर यशोदा आणि वर्धा नदीच्या पुराने प्रभावित झालेल्या हिंगणघाट तालुक्यातील कानगावं, शिरसगाव, मनसावळी,चानकी कान्होली, गावातील शेतकऱ्यांशी त्यांनी  संवाद साधला. विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याची आणि जमिनी खरडून गेल्याची व्यथा लोकांनी त्यांच्याकडे मांडली आहे. पाळीव जनावरं वाहून गेली. त्यांना पंचनाम्याची अट शिथिल करण्याची गावकऱ्यांची मागणी होती.


आमच्या शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका : अजित पवार


विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, पूरग्रस्त शेतमजुरांना अनेक दिवस शेतात जातं आलं नाही. शेतकऱ्यांना हरभरा पिकासाठी मदत दिली पाहिजे. खरीप संपलाय आणि रब्बी सुरू व्हायला वेळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करावं याचा कृषि विद्यापीठांनी विचार करावा. पुरात वाहून गेलेल्या जनावरांचे पैसे अजूनही मिळाले नाही. पंचनामे अजूनही सगळीकडचे संपलेले नाही. पंचनामे करता माणसं कमी पडत असतील तर ते माणसं उपलब्ध करून देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे आग्रही विनंती आहे की, त्यांनी आमच्या शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, शेतकऱ्यांची सहनशीलता आता संपलेली आहे, असं अजित पवार म्हणाले.


'हिंगणघाट शहराच्या पूरग्रस्त भागात स्वच्छता आवश्यक'
 
अजित पवार म्हणाले की, ''हिंगणघाट तालुक्यात शहरी भागातही अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेला आहे. लोकांना स्वच्छ पाणी देणं अत्यंत गरजेचे आहे. पुरामुळे ग्रामीण भागात डेंग्यू सारखे अनेक गंभीर आजार डोकेवर काढत आहे. त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांना कामाला लावने नितांत गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या जमीन तर खरडून गेल्या आहेत. शेतकऱ्यांशी अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. शेतकऱ्यांना पुढील काही वर्ष पीक घेता येणार नाही. त्यामुळे भविष्यातील नुकसान आणि त्याचा संसार योग्य पद्धतीने चालण्याचा दृष्टिकोन लक्षात घेऊन, एसडीआरएमचे नियम बाजूला ठेवून मदत दिली पाहिजे.''


'सोयाबीनच्या बियाण्यांचा मोठा प्रश्न निर्माण होणार'


''वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकते असं लक्षात आलेलं आहे, आणि मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे नुकसान झालेला आहे, अतिवृष्टीमुळे सोयाबीन बेचिराख झालेला आहे, पीक उध्वस्त झालेला आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी सोयाबीनच्या बियाण्यांचा खूप मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. कृषी विभागाला सोयाबीन बीज उत्पादनाचे कार्यक्रम घ्यावे लागतील'', असेही अजित पवार बोलताना म्हणाले.