Kankavali Vaibhavwadi Devgad :  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurga Politics) राजकीय दृष्ट्या कायम चर्चेत असलेलं ठिकाण. नारायण राणे (Narayan Rane) यांचं राजकीय प्राबल्य या ठिकाणी दिसून येतं. सध्या कणकवली - देवगड - वैभववाडी विधानसभा मतदारसंघात नारायण राणे यांचे कनिष्ठ पुत्र नितेश राणे (MLA Nitesh Rane) आमदार आहेत. राज्यात सध्या घडलेल्या घडामोडी पाहता या मतदारसंघात नेमकी काय स्थिती असणार आहे? याकडे देखील लक्ष देणे गरजेचं आहे. कारण, शिवसेनेचे काही नेते या भागात नितेश राणे यांना आव्हान उभं करणार का? या दृष्टीनं देखील त्याकडे पाहायाला हवं. सध्या तरी या भागात नितेश राणे यांना पर्याय नाही असं चित्र असलं तरी राजकारणात परिस्थिती केव्हाही बदलते असं म्हणतात. त्यामुळे आताच्या स्थितीचा परामर्श घेण्याचा एक प्रयत्न. 


यासाठी आम्ही सकाळ वृत्तपत्राचे सिंधुदुर्ग जिल्हा आवृत्तीप्रमुख शिवप्रसाद देसाई यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी 'कणकवली - देवगड - वैभववाडी विधानसभा मतदारसंघात राणे आणि शिवसेना अशीच लढत असणार आहे.पण, आताच्या घडीला शिंदे गटात शिवसेनेतील कुणी गेल्याचं दिसत नाही. जी लोकं इतर पक्षातून शिवसेनेत आली ती आता देखील शिवसेनेत आहेत. पण, त्याठिकाणी राणेंचा प्रभाव असल्यानं शिवसेनेला टक्कर द्यावी लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी या ठिकाणी संघर्ष असणार आहे' अशी प्रतिक्रिया 'एबीपी माझा'शी बोलताना दिली आहे.


कोकणातील शिवसेनेची स्थिती काय, वाचा- Maharashtra Political Crisis : शिवसेनेतील बंडानंतर कोकणात शिवसेनेची काय स्थिती? फायदा नेमका कुणाला?


यानंतर आम्ही वरिष्ठ पत्रकार गणेश जेठे यांना देखील याबाबत सवाल केले. त्यावेळी बोलताना त्यांनी 'कणकवली येथे शिवसेनेचा उमेदवार कोण असणार आहे? हे देखील पाहावं लागेल. सध्या नितेश राणे मतदारसंघात सक्रीय आहेत.त्यांचा वावर आणि संपर्क देखील चांगला आहे. आमदार म्हणून त्यांची हि दुसरी टर्म आहे.त्यामुळे शिवसेनेसाठी कणकवली - वैभववाडी - देवगड या विधानसभा मतदारसंघात लढत सोपी नसणार आहे. उदय सामंत आणि दिपक केसरकर शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेनेचे स्थानिक पातळीवरील नेते, पदाधिकारी मात्र अद्यापही शिवसेनेत आहेत. उद्धव ठाकरे यांचं ते समर्थन करत आहेत. त्यामुळे शिवसेनेत कणकवली - वैभववाडी - देवगड या मतदारसंघात मोठी पडझड झालेली नाही. सतीश सावंत यांनी यापूर्वी निवडणूक लढवली. पण, त्यांचा पराभव झाला.त्यामुळे यावेळी सावंत का इतर कोण उमेदवार असणार हे पाहावं लागेल. अशी प्रतिक्रिया त्यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली. यानंतर आम्ही त्यांना भोंग्यांचा गाजलेला प्रश्न आणि वैभववाडी तालुक्यात मुस्लिम बांधवांची संख्या पाहता त्याचा फटका नितेश राणे यांना बसेल का? असा सवाल केला. त्यावर बोलताना त्यांनी 'कोकणात हिदू - मुस्लिम वाद कधी झाल्याचं दिसून येत नाही. सर्वजण एकत्र नांदताना दिसतात. भोंग्यांचा विषय निघाल्यानंतर नारायण राणे यांच्यासोबत असलेले मुस्लिम नेते, कार्यकर्ते नाराज किंवा राणेंना सोडून गेले असं झालं नाही. शिवाय, स्थानिक पातळीवर आपले संबंध कसे आहेत? यावर देखील सारी गणितं अवलंबून असतात. त्यामुळे भोंग्यांचा वाद आणि त्याता फारसा परिणाम होईल असं म्हणता येणार नाही' अशी प्रतिक्रिया दिली.


राजापूर मतदारसंघात काय हालचाली-  Rajapur Assembly Constituency : शिवसेनेतील बंडाळीनंतर राजापूरमध्ये पडझड नाही, पण..


सध्या नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत. त्यामुळे केवळ कणकवलीच नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे लक्ष घालणार हे नक्की असणार आहे. राणेंच्या बाजुनं विचार करायचा झाल्यास नारायण राणे शिवसेनेत असल्यापासून त्यांचा संपर्क चांगला आहे. मध्यंतरीच्या काही काळात त्यांना पराभवाचा सामना देखील करावा लागला. पण, सध्या नारायण राणे यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांना खासदारकी देत केंद्रात पाठवले गेले. नारायण राणे यांनी सातत्यानं शिवसेनेवर टिका केली आहे. आत्ताच्या घडीला देखील नारायण राणे शिवसेनेवर 'प्रहार' करत असतात. त्यामुळे आगामी विधानसभा असो अथवा लोकसभा निवडणूक यासाठी नारायण राणे अधिक आक्रमकपणे मैदानात उतरणार हे नक्की असणार आहे. 


गुहागरमध्ये काय होणार, वाचा - Guhagar Assembly constituency : गुहागर विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या भास्कर जाधव यांचं पारडं जड, पण...


त्यामुळे केवळ कणकवली विधानसभा मतदारसंघच नाही तर जिल्ह्यात देखील त्यांचा झंझावात दिसून येणार आहे. पण, कोकणी माणूस आणि शिवसेना हे समीकरण देखील नजरअंदाज करून चालणार नाही. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेच्या पाठिशी कोकणी माणूस किती राहतो? शिवसेनेच्या पारड्यात किती मंत टाकतो यावर देखील शिवसेनेची सारी गणितं अवलंबून असणार आहे. पण, जाणकारांशी बोलल्यानंतर कणकवली - वैभववाडी - देवगड मतदारसंघात लढत चुरशीची होणार आहे हे नक्की!