Ajit Pawar on Yugendra Pawar : मला इंग्लिश न येऊनही मी राज्याचा उपमुख्यमंत्री (Deputy CM), साडेसहा लाख कोटींचं बजेट सादर करतो, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत. तसेच पुढे बोलताना अजित पवारांनी पुतणे आणि त्यांच्या विरोधात बारामतीतून (Baramati) विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Election 2024) लढवणाऱ्या युगेंद्र पवारांवरही निशाणा साधला आहे. साडेसहा लाख कोटी मधला त्याला टिंब काढून दाखव म्हणावं, असं म्हणत अजित पवारांनी युगेंद्र पवारांवर (Yugendra Pawar) निशाणा साधला आहे. तसेच, 1989 ला साहेब म्हणत होते, मी अजितला तिकीट देणार नाही, मला 1991 ला तिकीट दिलं, आता लोकांनी काम सुरू केलं नाहीतर लगेच यांना आमदारकीची स्वप्न पडायला लागलीत, असं म्हणत अजित पवारांनी युगेंद्र पवारांवर निशाणा साधला आहे.
बारामती लोणी भापकर इथल्या सभेत अजित पवार बोलत होते.
काही लोकांनी काल काम सुरू केलं, त्यांना आता आमदारकीची स्वप्न पडतायत : अजित पवार
अजित पवार बोलताना म्हणाले की, "आपल्या तालुक्यातील मुलं काम करीत असतील तर त्याला मलिदा गँग का म्हणता? आज विरोधात बोलायला काही नाही म्हणून ते काहीही मलिदा गँग बोलतात. काम करीत असताना जातीचा आणि नात्या-गोत्याचा विचार केला नाही. गावातले पुढारी नीट वागत नाहीत. त्याचा राग माझ्यावर निघतो. ही निवडणूक झाल्यावर काही नव्या चेहऱ्यांना मी पुढे आणेल." पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, "तुम्ही मला थेट खासदार केलं नाही. त्याआधी मी काम करत होतो. साहेब मुख्यमंत्री झाल्यावर मी तालुक्याला कसा फायदा होईल ते बघितलं? 1989 ला साहेब म्हणत होते, मी अजितला तिकीट देणार नाही, 91 ला मला तिकीट दिलं. आता काही लोकांना काल काम सुरू केलं नाही की, त्यांना आमदारकीची स्वप्न पडायला लागली आहेत."
मला इंग्लिश न येऊनही, मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. मी साडेसहा लाख कोटींचं बजेट सादर करतो. साडेसहा लाख कोटी मधला त्याला टिंब काढून दाखव म्हणावं. तो माझा पुतण्या आहे. मी त्याच्यावर टीका नको करायला, असं अजित पवार म्हणाले आहेत. तसेच, पुढे बोलताना मी सुनेत्राला उभा नव्हतं करायला पाहिजे, असा पुनरुच्चारही अजित पवारांनी केला आहे.
मागे साहेबांना खुश केलं, आता मला करा : अजित पवार
अजित पवार म्हणाले की, "मी जेवढं काम करू शकतो, तेवढं महाराष्ट्रमधील एकही आमदार काम करू शकत नाही. मी एकटा निवडून येऊन काय उपयोग नाही. माझे सहकारी निवडून येणं गरजेचं आहे. जेवढे निवडून येतील तेवढी माझी ताकद वाढेल. त्याचा फायदा बारामती आणि जिल्ह्याला होणार आहे. मोदींसमोर सांगितलं मी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारानं पुढं चाललो आहे. जातीत तेढ निर्माण झाला नाही पाहिजे, गाव पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका, मागे साहेबांना खुश केलं आता मला करा. मी सगळ्या समाजाला जागा दिल्यात. मी शाहू फुले अमबेडकर यांचे नाव घेतो तशा जागा दिल्या. बाकीच्यांनी तसे केलं नाही. धनगर समाजाला एसटी मध्ये जागा मिळत नाही, म्हणून त्यांना ताशा सवलती दिल्या. इतकी वर्षं पर्याय नव्हता पण आता पर्याय आहे. आता काय झालं की चाललो तिकडे. औटघटकेचा विचार करु नका. मी तुमचे मत वाया जाऊ देणार नाही. विश्वासाल तडा जाऊ देणार नाही, कोळी राष्ट्रसंघाच्या वतीनं मला जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो."