मुंबई: आमची टर्म संपायच्या आत मुंबईतील एक-एक बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भाजप वेचून बाहेर काढण्याचे काम करेल, असे प्रतिपादन भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केले. तसेच या देशात आम्ही मुस्लिमांना कदापि आरक्षण (Muslim Reservation) मिळू देणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. ते मंगळवारी घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. (Amit Shah in Mumbai)
उलेमा बोर्डाचे शिष्टमंडळ नुकतेच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना भेटले. त्यांनी मुस्लिमांना 10 टक्के आरक्षण, काझींसाठी दरमहा 15 हजार रुपये पगार अशा मागण्या केल्या आहेत. मात्र, आम्ही मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही. धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद देशाच्या राज्यघटनेत नसल्याने आम्ही मुस्लीम किंवा अल्पसंख्यांकांना आरक्षण मिळू देणार नाही. आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली 50 टक्क्यांची मर्यादा संपलेली आहे. मुस्लिमांना आरक्षण द्यायचे असेल तर दलित, ओबीसी, आदिवासी यांचे आरक्षण कमी करुन मुस्लिमांना द्यायचे का?, असा सवाल अमित शाह यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारला.
यावेळी अमित शाह यांनी मुंबईतील बांगलादेशी (Bangladeshi) आणि रोहिंग्या (Rohingya) नागरिकांच्या समस्येचाही मुद्दा उपस्थित केला. मुंबईकरांनो ही टर्म संपायच्या आधी एक-एक बांगलादेशी आणि रोहिंग्यांना वेचून-वेचून मुंबईबाहेर करण्याचे काम भाजप पक्ष करेल, असे अमित शाह यांनी म्हटले.
राहुल गांधींच्या चार पिढ्या आल्या तरी कलम 370 पुन्हा लागू होणार नाही: अमित शाह
अमित शाह यांनी घाटकोपरच्या सभेत कलम 370च्या मुद्द्यावरुन काँग्रेसला (Congress) लक्ष्य केले. जम्मू-काश्मीरला स्वायत्तता देणारे राज्यघटनेतील अनुच्छेद 370 परत लागू करु शकणार नाही. राहुल गांधी यांच्या चार पिढ्या आल्या तरी आम्ही ही गोष्ट शक्य होऊ देणार नाही, असे अमित शाह यांनी म्हटले. भाजपने देशाच्या संस्कृतीचे कायम रक्षण केले. अयोध्येत भव्य राममंदिर उभारले. काशीविश्वनाथ कॉरिडोअरचे काम झाले आणि सोमनाथ मंदिराला सोन्याचा मुलामा देण्याचे काम सुरु आहे. बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून आलेल्या लाखो हिंदूंना भारतीय नागरिकत्त्व देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हे निर्णय चुकीचे होते का, असा सवाल अमित शाह यांनी काँग्रेसला विचारला.
आणखी वाचा
RSS वर बंदी, पोलीस भरतीत मुस्लिमांना प्राधान्य द्या, उलेमा बोर्डाने मविआला धाडलं पत्र, विहिंप आक्रमक