अहमदनगर : महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी बरोबर बंदोबस्त केलाय, मग तू किस झाड की पत्ती है असं म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) नगरचे शरद पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांना इशारा दिला आहे. माझ्या नादी लागलास तर तुझा असा कंड जिरवेन की सगळीकडे तुला अजित पवारच दिसेल असंही ते म्हणाले. अहमदनगरमध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ बोलताना अजित पवारांनी निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली. 


काय म्हणाले अजित पवार? 


चुकीची माणसं दिलेत तर तिथली बाजारपेठ उद्ध्वस्त होते. लोक म्हणतात आम्ही तुम्हाला पाहून मतदान दिलं, नको त्या माणसाला निवडून दिलं. गेल्या आमदारकीला माझीसुद्धा चूक झाली. त्यावेळी तुमच्यातलेच अनेकजण माझ्याकडे आले होते. निलेश ला उमेदवारी द्या अशी त्यांनी मागणी केली.


आमदार झाल्यावर लक्षणं समजली


तुमच्यासाठी उमेदवारी दिली, मात्र वाटलं नव्हतं बाबा असे दिवे लावेल. गडी दिसायला बारीक दिसतो, मात्र लय पोहोचलेला आहे. मला त्यावेळी घरी घेऊन गेला. कसं साधं घर आहे, कसे साधे आई-वडील आहेत हे सांगितलं. आमदार झाल्यावर त्याची एक एक लक्षण कळायला लागली. अधिकाऱ्यांना देखील धमक्या देत होता. आम्ही उपमुख्यमंत्री असूनही जिल्हाधिकाऱ्यांशी व्यवस्थित बोलतो आणि हा पट्ट्या पोलिसांनाही तुमचा बाप येतोय अशी धमकी देतो. 


माझ्या नादी लागू नकोस


अरे निलेश बेटा, तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्तर मी आहे. तू जर माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या आणि मी जर तुझ्या मागे लागलो तर, आमच्या ग्रामीण भागात एक शब्द आहे कंड जिरवतो, तुझा असा कंड जिरवेन की तुला सतत अजित पवार डोळ्यासमोर दिसेल. माझ्या नादी लागू नको, महाराष्ट्रात जे जे माझ्या नादी लागले त्यांचा पुरता बंदोबस्त मी केलाय. तू तर किस झाड की पत्ती. मी जोपर्यंत शांत आहे तोवर शांत आहे.


लंकेंची अरेरावी सहन करू नका


आचारसंहिता संपल्यावर मी अधिकाऱ्यांची बैठक घेईन. आता तर तो आमदारही नाही. तो तुमच्यासारखा सर्वसामान्य माणूस झालाय. त्यामुळे त्याची अरेरवी आता अधिकाऱ्यांनी सहन करू नये. आपल्या कार्यकर्त्यांनी अरेरावी करू नये. मात्र कोणी अंगावर आलं तर शिंगावर घेतल्याशिवाय स्वस्थ बसू नका. निवडणूक आयोगाला सुद्धा पारनेरमध्ये जास्त बंदोबस्त देण्याची आम्ही मागणी करणार आहोत. इथे प्रत्येक व्यावसायिकाला आणि डॉक्टरला बिल न घेण्यासाठी दादागिरी केली जाते हे सुद्धा मला समजलं. तुम्ही अजिबात घाबरू नका महायुती आता तुमच्या पाठीशी आहे. 


निलेशचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा


लोकसभा निवडणुकीत या निलेशचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा. अजूनही कोणी दहशतीत असेल तर त्याला जाऊन सांगा अजित पवार आला होता व तो आपल्या पाठीशी आहे. आपल्या आमदाराने राजीनामा दिला आता कोण वाली हे समजू नका. पालकमंत्री विखे आता आपल्यासोबतच आहेत. महाराष्ट्राला दाखवून द्या हा फुगा होता. इथले नगराध्यक्ष मला येऊन भेटले त्यांनी सांगितलं. मी त्यांना म्हणालो इतके दिवस गप्प का? आधी बोलले असते तर आधीच बंदोबस्त केला असता. गडी पुरता वाया गेलाय, आता त्याला घरी पाठवल्याशिवाय पर्याय नाही. 4 जूनला पेट्या उघडल्यावर हे लंकेचा पार्सल घरी पाठवण्याचं काम करा. 


ही बातमी वाचा: 



VIDEO : Ajit Pawar On Nilesh Lanke : माझ्या नादी लागतोत्याचा मी बंदोबस्त करतो - अजित पवार