अहमदनगर : आपल्यावर वैयक्तिक टीका करणाऱ्या सुजय विखेंनी (Sujay Vikhe) विकासाच्या मुद्द्यावर बोलायला हवं, गेल्या 50-60 वर्षांपासून जिल्ह्यावर वर्चस्व असलेल्या विखेंनी आधी त्यांच्या घराकडे जाणारा नगर मनमाड रस्ता बांधावा असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी लगावला आहे. जगात विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाते, पण आपल्याकडे हिदू-मु्स्लिम वाद केला जातोय असं म्हणत लंकेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टोला लगावला. 


निवडणूक लागल्यापासून ज्या ज्या सभा झाल्या त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे निलेश लंके यांनी म्हटलं आहे. समोरच्या उमेदवाराप्रमाणे आम्हाला पाचशे रुपये देऊन लोक जमा करण्याची वेळ येत नाही असं म्हणत निलेश लंके यांनी सुजय विखे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.


अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर नाही


निलेश लंके काळा की गोरा हे शरद पवार यांना माहिती नसताना मी त्याला निधी दिला आणि तो आज तिकडे गेला अशी टीका अजित पवार यांनी केली होत. त्यावर निलेश लंके यांना विचारलं असता त्यांनी बोलणं टाळलं आहे. मी ते वक्तव्य ऐकलेलं नाही, एकदा माहिती घेतो आणि मग बोलतो असं निलेश लंके यांनी म्हटलं आहे.


आधी घराकडे जाणारा रस्ता बांधावा


शरद पवार यांनी उभे केलेले सर्व दहा ते दहा उमेदवार पडतील अशी टीका सुजय विखे यांनी केली होती. त्याला निलेश लंके यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. निलेश लंके म्हणाले की, जिल्ह्यावर 50 ते 60 वर्षापासून त्याचं नेतृत्व आहे. त्यांना साधं त्यांच्या घराकडे जाणारा नगर मनमाड रस्ता बनवता आला नाही, एखादं शासकीय मेडिकल कॉलेज आणता आलं नाही. त्यांनी त्यांनी वैयक्तिक टीका टिप्पणी करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर बोलायला हवं. डाळ, साखर वाटणे हे काही खासदाराचं काम असतं का?


हिंदू-मुस्लिम दंगली घडवण्याचा प्रयत्न 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगरमध्ये मंगळवारी केलेल्या भाषणावरून देखील त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू मुस्लिम मुद्द्यावर भाषण केलं. कोणत्याही विकसित देशातील नागरिक हा तिथल्या विकासाबाबत चर्चा करत असतो. मात्र आपल्या देशात हिंदू मुस्लिम आणि जातीय तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. 


योगी आदित्यनाथ यांचे 11 तारखेला अहमदनगर शहरात होणाऱ्या रॅलीबाबत बोलताना निलेश लंके म्हणाले की, त्यांच्या येण्याने कोणताही परिणाम होणार नाही. त्यांना पाचशे रुपये देऊन लोक जमा करावी लागतात. कालच्या मोदींच्या सभेतच 500 रुपये वाटतानाचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. 


ही बातमी वाचा: