Ajit Pawar on Narendra Modi : "पुणे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी शरद पवार यांच्यावर बोलू नये अशी विनंती मी स्वतः केली होती. मात्र नेमकं त्याचवेळी नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा (Sharad Pawar) उल्लेख 'भटकती आत्मा' असा केला. त्यामुळे निवडणुकीत मोठा फटका बसला", याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.  महाराष्ट्रातील जागा कमी का झाल्या याबाबत चर्चा करताना अजित पवार यांनी उपस्थितांना निवडणुकीचा प्रचारावेळीचा किस्सा सांगितला. ते नाशिकमध्ये बोलत होते.  


महायुतीच्या येवला लासलगाव मतदारसंघातील नेत्यांची बैठक सध्या सुरु आहे. मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते  छगन भुजबळ यांच्या येवला येथील कार्यालयात सुरू महायुतीची बैठक सुरु आहे. बैठकीत नाशिक लोकसभा मतदार संघातील पराभवाबाबत चर्चा सुरू आहे. आगामी विधानसभेत नाशिक जिल्हयातून जास्तीत जास्त जागा कशा आणायच्या याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली. 


लोकसभा निवडणुकीवेळी पुण्यात झालेल्या सभेत मोदी काय काय म्हणाले होते?


पुण्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भटकती आत्मा' असा उल्लेख करत शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले होते. 1995 मध्ये राज्यात सेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले. मात्र, ‘भटकती आत्मा’ तेव्हाही या सरकारला अस्थिर करण्याचा डाव खेळत होती. 2019 मध्येही त्यांनी जनादेशाचा अपमान केला. महाराष्ट्रानंतर आता देश अस्थिर करण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. महाराष्ट्राला अशा भटकत्या आत्म्यांपासून वाचविले पाहिजे. महाराष्ट्रात महायुती मजबूत आहे. या मजबुतीनेच त्यांनी पुढे जावे. मागच्या 25 ते 30 वर्षांत ज्या उणिवा राहिल्या. त्या आपण दूर करुया. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नक्कीच नवी झेप घेईल. त्याचबरोबर एनडीए आघाडी सरकार महाराष्ट्राला नवीन उंचीवर नेल्याशिवाय राहणार नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले होते.


शरद पवारांनी मोदींना काय प्रत्युत्तर दिलं होतं? 


शरद पवार मोदींना प्रत्युत्तर देताना म्हणाले की, "मोदी म्हणाले की, यांच्या हातात सत्ता गेली तर तुमचं मंगळसूत्र काढून घेतील. यापूर्वी असं कधी घडलं आहे का? यांच्या हाती सत्ता आली तर तुमच्या म्हशी काढून घेतील. मोदींनी सर्व मर्यादा पाळल्या नाहीत. आम्ही राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करतो. पण मर्यादा ठेवता. माझा भटकता आत्मा म्हणून उल्लेख केला. एका दृष्टीने बर झालं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा कायम राहतो. हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही"


इतर महत्वाच्या बातम्या


बीडमध्ये सुपारी फेकणारे 8 जण ताब्यात; पोलीस अधीक्षकांना राज ठाकरेंचा सवाल, इंटेलिजन्स नाही का?