बीड : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मराठवाडा दौऱ्याला काही ठिकाणी विरोध होत असून आरक्षणासंदर्भात त्यांनी केलेल्या विधानावरुन मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाचं केंद्रस्थान असलेल्या बीड जिल्ह्यात आज राज ठाकरेंचा ताफा आला असता, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकून जोरदार आंदोलन केलं. राज ठाकरे यांचे बीड (Beed) शहरामध्ये आगमन झाल्यानंतर मनसैनिकांनी मोठ्या पुष्पहारासह बीडस्टाईल त्यांचं स्वागत केलं. मात्र, काही वेळातच, उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सुपाऱ्या फेकून चले जाव, अशा घोषणाही केल्या. त्यानंतर, राज ठाकरे यांनी पोलीस (Police) अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना याबाबत विचारणा केली आहे. तसेच, यापुढे खबरदारी घेण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर मनसेनंही आता आक्रमक पवित्रा घेतला असून सुरुवात तुम्ही केलीय, आता शेवट आम्ही करू, असे म्हणत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला इशाराही दिलाय. आता, राज ठाकरे यांनी बीडमधील पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधत विचारणा केली आहे. राज ठाकरे यांनी बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि पोलीस उपअधीक्षक विश्वंभर गोल्डे यांना हॉटेलमध्ये बोलावून घेत ही घटना घडण्यापूर्वी आपले इंटेलिजन्स नव्हते का?, असा प्रश्न विचारत अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको होती, अशी खंत देखील व्यक्त केली. दरम्यान, भविष्यात असे प्रकार होऊ नये, त्यासाठी खबरदारी घ्या, अशा सूचनाही राज ठाकरे यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
बीडमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची कार अडवल्यानंतर मनसे शहराध्यक्ष करण लोंढे आणि शैलेश जाधव या दोघांनी या आंदोलनावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे काही काळ मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये राडा झाला, यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गणेश वरेकर यांचा शर्ट सुद्धा फाटल्याचं दिसून आलं. दरम्यान, केवळ राजकीय विरोधातून हा प्रयत्न झाला याचा आणि मराठा आरक्षणाचा काही संबंध नाही असे मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे.
आम्ही सुद्धा बीडवरून सुरुवात केलीय शेवट मुंबईत करू - गणेश वरेकर
राज ठाकरे यांचे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी गाडी अडवल्यानंतर संदीप देशपांडे यांनी सुरुवात उद्धव ठाकरे गटाने केली आता शेवट आम्ही करू असं म्हटले होते, त्यावर आम्ही बीडमधून सुरुवात केली आणि शेवट मुंबईत करू असा पलटवार शिवसेनेचे बीड जिल्हाध्यक्ष गणेश वरेकर यांनी केला आहे. त्यामुळे, शिवसेना आणि मनसेतील हा वाद आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे.