Ajit Pawar NCP : अरुणाचल विधानसभेच्या निवडणुकीत 3 जागा निवडून आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आलाय. अजित पवारांची राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळावा, यासाठी निवडणूक आयोगाकडे दावा करणार आहे. यासाठी राष्ट्रवादीकडून लवकरच निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात येणार आहे. मागच्या वर्षी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला होता. दरम्यान, अरुणाचल प्रदेशमधील विजयानंतर पक्ष पुन्हा राष्ट्रीय दर्जासाठी दावा करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर हा दावा करणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सध्या अरुणाचल प्रदेश, नागालँड, महाराष्ट्र आणि झारखंड येथे विधानसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी मागणी करण्यात येणार आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या हालचालींबाबत जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा ? हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे त्यावर कोणी भाष्य करणे योग्य नाही. आमचे चिन्ह त्यांनी चोरले आहे त्याचा फायदा त्यांना मिळाला आहे. न्यायालयात वाद सुरू असताना अशा दाव्यांना काही अर्थ आहे असे मला वाटत नाही. ज्या दिवशी राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता काढून घेण्यात आली होती, त्याच दिवशी मला माहित होतं काहीतरी झोल आहे. जे साहेबांबरोबर सकाळी चहा प्यायचे ते दुपारी हेच काम करायचे, अशी टीका शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. आमच्यात मोठा गट कोण आहे. ज्यांना बीजेपीत जायचे डोहाळे लागले ते लोक हे बोलत आहेत. तुम्हाला हवे तिथे जा, आम्ही शरद पवार साहेबांचे निष्ठावान आहोत, असंही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं.
काही फरक आढळला तर आम्ही मशीन मधली आकडेवारी पकडणार, मग कशाला देता 17 सी फॉर्म?
आधी पोस्टल बॅलेट सर्वात आधी मोजायचे आता सर्वात शेवटी मोजणार आहेत. कारण 50 जागा अशा आहेत देशातल्या या ठिकाणी हजारच्या फरकाने निवडून येता येईल, त्या ठिकाणी शेवटच्या क्षणी काहीतरी गडबड करायची आहे. आता नवीन नियम असा आहे की, या फॉर्ममध्ये आणि मशीनमध्ये जर काही फरक आढळला तर आम्ही मशीन मधली आकडेवारी पकडणार, मग कशाला देता 17 सी फॉर्म? जर मशीन मध्ये जास्त बोट निघाले तर आम्ही विचारायचं नाही, मग कशाला देता 17 सी फॉर्म, आधीच निवडणुकीबद्दल संशयास्पद वातावरण आहे अजून कशाला निर्माण करतात? असे सवालही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या