Maharashtra Politics नागपूर : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बीडच्या माजलगाव मतदार संघातील आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांना मंत्रिपद मिळाले नसल्याने ते नाराज असल्याचं बोलले जात होते. सोमवारी अधिवेशन संपल्यानंतर सोळंके यांनी नागपूरहून थेट माजलगाव गाठले. त्यामुळे प्रकाश सोळंके यांची नाराजी दिसून येत होती. परंतु या नाराजी नाट्यावर प्रकाश सोळंके यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. 


पक्षश्रेष्ठीने योग्य निर्णय घेतला, त्यामुळे कदाचित.... 


मी नाराज व्हावं असं काही नाही. मतदारसंघात माझी काम होती आणि आज अधिवेशनात विशेष काही नव्हते. त्यामुळे मतदारसंघात परतलो असल्याचं सोळंके यांनी म्हटलंय. तर मंत्रिपद न मिळाल्याने पक्षश्रेष्ठीने योग्य निर्णय घेतला, त्यामुळे कदाचित तसे असेल. मात्र मी नाराज नसून मतदारांनी जो विश्वास दाखवला. त्या अनुषंगाने मतदारसंघात काम करणार आहे. माजलगाव विधानसभा मतदारसंघात प्रकाश सोळंके हे पाचव्यांदा आमदार झालेत. तर ते सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळे सोळंके यांना  मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा समर्थकांना होती. मात्र पक्षाने त्यांना मंत्रिपद नाकारल्याने त्यांचे समर्थक मात्र नाराज असल्याचे बोलले जात आहे.


मी नाराज नाही, तरुणांना संधी दिली यात मला आनंद- धर्मराव बाबा अत्राम


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) रविवारी झाला. यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना  मंत्रिमंडळातून डावलण्यात आले असल्याने अनेक राजकीय घडामोडी घडत असताना मी नाराज नाही, आता पक्ष संघटनेचं मला काम करायचं असल्याचे मत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी व्यक्त केलं आहे. यावेळस मी मंत्री झालो नसलो तरी भविष्यात मी निश्चित मंत्री बनेल, असा विश्वास ही धर्मराव बाबा अत्राम यांनी व्यक्त केला. मी नाराज नाही, आता पक्ष संघटनेचं मला काम करायचं आहे. तरुणांना संधी दिली यात मला आनंद आहे.


इतर महत्वाच्या बातम्या