मुंबई: महायुती सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पार पडला आहे. त्यानंतर आता खातेवाटपाकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे. हे खातेवाटप येत्या दोन-तीन दिवसांत पार पडेल, अशी माहिती आज शिवसेना आमदार उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे. या मंत्रिमंडळात 33 कॅबिनेट मंत्री असल्यामुळे खातेवाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कसरत करावी लागणार आहे. खातेवाटप हा सर्वस्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अधिकारातील विषय आहे. तेच यासंदर्भात निर्णय घेणार आहेत, तर खाते वाटपामध्ये कोणताही तिढा नाही खाते वाटपात कोणताही समन्वय नाही, असा कोणताही विषय नाही तिन्ही नेते एकत्र बसून दोन दिवसांमध्ये निर्णय घेतील, असंही सामंत (Uday Samant) म्हणाले आहेत.


खाते वाटपाबाबत अद्याप तिढा असल्याच्या राज्याच्या राजकारणात चर्चा आहेत, त्याबाबत आज शिवसेना नेते उदय सामंत यांनी माध्यमांसमोर सविस्तरपणे भाष्य केलं आहे. माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य ते त्यांच्या विभागासंदर्भात  कार्यवाही सुरू करतील, असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्यामुळे खाते वाटपामध्ये कोणताही तिढा नाही. खाते वाटपात कोणताही समन्वय नाही असा कोणताही विषय नाही तिन्ही नेते एकत्र बसून दोन दिवसांमध्ये निर्णय घेतील, असं सामंत (Uday Samant) यांनी म्हटलं आहे. 


 लवकरात लवकर खाते वाटप होईल


पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले, या अधिवेशनामध्ये प्रश्न उत्तराचा तास देखील नाही. लक्षवेधी देखील नाही. परंतु महाराष्ट्राच्या जनतेला अभिप्रेत असलेले विकासात्मक प्रश्न विरोधी पक्षांनी विचारले तर सरकार त्यांना उत्तर द्यायला देखील सक्षम आहे. खातेवाटप झालेले नसलं तरी मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री सक्षम आहेत. त्यामुळे लवकरात लवकर खाते वाटप होईल तिन्ही मंत्री अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतील अशी माझी खात्री आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.


छगन भुजबळ यांच्या बाबतीमध्ये मी काही वक्तव्य करणार नाही


काही नेत्यांना मंत्रिपद दिले नसल्याने ते नाराज आहेत. त्यांनी उघडपणे नाराज व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांच्या कार्यकर्ते देखील जाळपोळ करून आंदोलन करून ती नाराजी व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे छगन भुजबळ देखील अधिवेशनासाठी न थांबता त्यांच्या मतदारसंघात परतले आहेत, त्याबाबतच्या प्रश्नावर बोलताना उदय सामंत म्हणाले, छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा हा पक्षांतर्गत विषय आहे आणि छगन भुजबळ यांच्या बाबतीमध्ये मी काही वक्तव्य करणार नाही. मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी वक्तव्य करणं चांगल दिसत नाही. त्यांच्या बाबतीतला योग्य तो निर्णय अजित पवार आणि त्यांच्या पक्षातील सर्व नेते घेतील. त्यांच्यावर मी काही बोलणं योग्य दिसत नाही. आम्ही सर्वजण सोबत आहोत महायुतीमध्ये आहोत. एखाद्या पक्षातील नेत्याला मंत्रीपद मिळालं नसेल तर त्याच्या बोलण्याचा अधिकार मला नाही, असेही पुढे सामंत म्हणालेत. 


नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू


एखाद्याला मंत्रिपद मिळालं नाही तर नाराजी निर्माण होऊ शकते. परंतु, शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक कुटुंब म्हणून काम करत आहे. आम्ही मंत्री झालो आहोत. त्यामुळे देखील आमची जबाबदारी वाढली आहे. पक्षातील जर कोणी नाराज झाला असेल तर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आम्ही विस्ताराने काम करत आहे. आम्ही अनेक लोकांशी चर्चा केली आहे. तानाजी सावंत, विजय शिवतारे हे आम्हाला ज्येष्ठ आहेत. ते देखील मंत्री होते. त्यांची नाराजी लवकरात लवकर दूर केली जाईल. जे आमचे बाकी आमदार आहेत, ते देखील मंत्री पदासाठी पात्र आहेत. शेवटी अकरा बारा मंत्री करत असताना नेत्याचा निकष लागतो. आणि त्या नेत्यांचा देखील त्यामध्ये दोष नसतो. पण जर मंत्रीपद देऊन देखील चांगलं काम केलं नाही, तर आम्हाला दिलेलं मंत्रिपद देखील काढून घेऊ शकतात. हे देखील भीती आमच्या सर्वांच्या मनात आहे. त्यामुळे आम्हाला देखील जनतेला अभिप्रेत असं काम केलं पाहिजे. सर्व आमदारांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे आणि महायुतीला न्याय दिला पाहिजे, असं सामंत पुढे म्हणालेत.