नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंत्रिमंडळ विस्तारात 9 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज होत नागपूर सोडून नाशिकला निघून गेले. छगन भुजबळ यांनी अधिवेशनाला जाणार नसल्याचं म्हटलं. पक्षाकडून देण्यात आलेली राज्यसभेची ऑफर देखील छगन भुजबळ यांनी धुडकावली असल्याचा पाहायला मिळालं. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार गेल्या 24 तासांपासून कुणालाच भेटले नसल्याची माहिती आहे. अजित पवार काल अधिवेशनाला देखील हजर नव्हते. ते आज अधिवेशनाला हजर राहणार की नाही याकडे देखील लक्ष लागलं आहे.
अजित पवार नागपूरमध्येच पण भेटी टाळल्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार काल विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हजर राहिले नव्हते. त्यामुळं अजित पवार कुठं आहेत याबाबत प्रश्न विचारला जात आहे. अजित पवार नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री यांचं निवासस्थान असलेल्या विजयगडमध्ये असल्याची माहिती आहे. कार्यकर्ते अजित पवारांना भेटण्यासाठी आलेले आहेत. मात्र, ते कुणाला भेटले नसल्याची माहिती आहे. काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधिमंडळात आले होते. काल अजित पवार अधिवेशनाला गैरहजर होते. ते गेल्या 24 तासांपासून कुणालाच भेटले नसल्यानं अजित पवार यांचं मौन चर्चेत आहे. अजित पवार नागपूरमध्ये नसल्याचं सांगितलं जातंय. आज विधिमंडळ अधिवेशनाला अजित पवार हजर राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
छगन भुजबळांच्या नाराजीवर राष्ट्रवादीचं मौन
छगन भुजबळ यांनी मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजी व्यक्त करत नागपूर सोडून नाशिकला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन प्रमुख नेते म्हणजेच राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी छगन भुजबळांच्या नाराजीवर कोणतंही भाष्य केलेलं नाही. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे संसदेच्या अधिवेशनाच्या निमित्तानं दिल्लीत आहेत. तर, अजित पवार यांनी नागपूरमध्ये असून देखील भेटीगाठी टाळल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं छगन भुजबळ यांच्या नाराजी प्रकरणी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचं मौन पाहायला मिळतंय.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाबाबत दोन मत प्रवाह असल्याची माहिती आहे. छगन भुजबळ यांच्या भूमिकेचा फायदा महायुतीला झाला असून त्यांना मंत्रिपद नसल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फटका बसू शकतो, असा मतप्रवाह राष्ट्रवादीच्या काही आमदारांमध्ये असल्याचं समोर आलं आहे.
इतर बातम्या :