मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास अवघे काही तास उरले असताना गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत तब्बल 38 निर्णय घेण्यात आले असून काही नव्याने महामंडळ स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली होती. ही विधानसभा निवडणुकीपूर्वीची (Vidhansabha Election 2024) मंत्रिमंडळाची शेवटची बैठक मानली जात आहे.   मात्र, या बैठकीला (Cabinet Meeting) सुरुवात झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उठून गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 


एका इंग्रजी दैनिकाच्या माहितीनुसार, अजित पवार या बैठकीत जेमतेम 10 मिनिटं बसले. उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीतून लगेच निघून गेले. त्यानंतर तब्बल दोन ते अडीच तास ही बैठक सुरु होती. या बैठकीत तब्बल 38 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यापैकी बहुतांश निर्णय हे राज्याच्या आर्थिक तिजोरीवर भार टाकणारे होते. परंतु, हे निर्णय घेतले जात असताना अर्थमंत्री अजित पवार हेच या बैठकीला उपस्थित नव्हते. याउलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेवटपर्यंत मंत्रिमंडळाच्या या बैठकीत उपस्थित होते.


अजित पवार नाराज असल्याने बैठकीतून निघून गेले?


सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार या बैठकीपूर्वी प्रचंड नाराज होते. राज्यातील कारभार आणि महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचे प्रस्ताव आपल्यासमोर शेवटच्या क्षणी आणले जातात. त्यासाठी योग्य त्या प्रक्रियेचे पालन होत नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीला काहीवेळ उरला असताना आपल्यासमोर प्रस्ताव ठेवले जातात. गेल्या काही दिवसांमध्ये अर्थखात्याने मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आलेल्या अनेक निर्णयांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे अजित पवार हे गुरुवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून निघून जाण्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. या सगळ्याबाबत अजित पवार यांनी अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही.


सुनील तटकरेंचाही बोलण्यास नकार


अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीतून का निघून गेले, याविषयी त्यांच्या पक्षातील नेत्यांनीही बोलण्यास नकार दिला. खासदार सुनील तटकरे यांना याविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा तटकरे यांनी म्हटले की, मी रायगडमध्ये होतो, त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झाले, हे मला माहिती नाही. मात्र, महायुतीमध्ये कोणतेही मतभेद किंवा दुरावा नाही. एखादा मंत्री बैठकीतून लवकर निघून गेला तर त्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ नये, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.


आणखी वाचा


मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाची रेकॉर्डब्रेक बैठक, 80 महत्त्वाचे निर्णय; नॉन क्रिमिलयरची मर्यादा 8 वरुन 15 लाख