मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे बेधडक स्वभावाचे नेते म्हणून सगळीकडे ओळखले जातात. एकादं काम हातात घेतल्यावर ते धसास लावण्याचा त्यांचा स्वभाव आहे. एखाद्या शासकीय अधिकाऱ्याने कामात कुचराई केल्यावर ते त्याला थेट फैलावर घेताना अनेकांनी पाहिलं आहे. सध्या लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) माहोल आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सडकून टीका करतायत. प्रचारादरम्यान हेच नेते एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसतायत. दरम्यान, अजित पवार यांनी आज (22 एप्रिल) एबीपी माझाशी खास बातचित केली. त्यानी अनेक प्रश्नांची बेधडक उत्तरं दिली. पण एका गोष्टीचा संदर्भ येताच अजित पवार यांनी थेट कान धरले. या गोष्टीवर मी काहीही बोलू शकत नाही, असं अजित पवार म्हणाले.
2014 ते 2019 सालापर्यंत काय काय घडलं ते सांगितलं
2014 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. त्यावेळी राष्ट्रवादीने (अविभाजित) भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 2017 सालीदेखील राष्ट्रवादीत भाजपसोतब जाण्याचा विचार चालू होता. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर तर पहाटेच्या शपथविधीचे प्रकरण सर्वांनाच माहिती आहे. या सर्व घटनांबाबत अजित पवार यांनी दिलखुलासपणे आपली भूमिका मांडली. 2014, 2017, 2019 साली नेमकं काय घडलं होतं? हे अजित पवार यांनी सांगितलं.
...तेव्हा सरकारमध्ये सामील होण्याची भूमिका
उद्धव ठाकरे यांचं सरकार जात होतं तेव्हा माझ्या ऑफिसमध्ये सगळे जमले होते. सर्व आमदारांनी सह्या करून शरद पवार यांना एक पत्र लिहिलं होतं. आपण सरकारमध्ये गेलं पाहिजे, अशी भूमिका या पत्राच्या माध्यमातून मांडण्यात आली होती. यामध्ये जयंत पाटील, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे अशा सर्वांच्या सह्या होत्या. राजेश टोपे ते पत्र शरद पवार यांच्याकडे घेऊन गेले होते, असं अजित पवार यांनी सांगितलं.
फोनवरच चर्चा करण्याचा शरद पवारांचा सल्ला
त्यावेळी मला, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील यांना अमित शाह यांच्याशी चर्चा करा असं सांगितलं होतं. आम्ही निघालोही होतो. पण नंतर शरद पवार यांनी सांगितलं की दिल्लीला जाऊ नका. इथेच फोनवरून चर्चा करा. त्यानंतर अमित शाह म्हणाले की अशी महत्त्वाची चर्चा ही फोनवर होत नाही. आपण सरकार बनवायला निघालो आहो. आमचा याआधीचा तुमच्याबाबतचा अनुभव चांगला नाही. तुम्ही अनेकदा आमच्यारोबरोबर यायचं ठरवलं. आम्ही न मागताही तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला. पण तुम्ही नंतर बदलता. तुमची भूमिका ठाम नसते. फोनवर बोलण्याएवढी तुमची विश्वासार्हता नाही. तु्म्ही दिल्लीला या. चर्चा करू. निर्णय घेऊ, असं अमित शाह म्हणाले होते. पण शरद पवार यांनी दिल्लीत जायचं नाही, असं सांगितलं. त्यानंतर अमित शाह यांनी मी फोनवर बोलणार नाही, असं सांगितलं, असा खुलासा अजित पवार यांनी केला.
2017 सालीही सरकारमध्ये सामील होण्याची भूमिका
2017 साली शिवसेनेला महायुतीतून बाहेर काढायचं आणि आम्हाला म्हणजेच राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं, अशी राष्ट्रवादीची भूमिका होती. भाजपने मात्र याला नकार दिला होता. आमची शिवसेनेसोबतची (अविभाजित) खूप वर्षांपासूनची मैत्री आहे. आम्ही एकत्र निवडणुका लढवूनच राजकारण करतो. आम्ही त्यांना कोणत्या कारणामुळे महायुतीतून बाहेर काढावे? असं चालणार नाही. ते स्वत:हून बाहेर जात असतील तर गोष्ट वेगळी आहे, असं भाजपचं मत होतं, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच हा प्रस्ताव आमच्या वरिष्ठांचाच होता. आम्ही कधीही आयुष्यात केंद्रातील इतर नेत्यांशी चर्चा केली नाही. बोलायचे ते फक्त शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल बोलायचे, असंही अजित पवार यांनी सांगितलं.
अजित पवारांनी कान धरले, हात जोडले
अजित पवार यांच्या याच स्पष्टीकरणानंतर एबीपी माझाच्या प्रतिनिधीने अजित पवार यांना एक प्रश्न विचारला. 2017 साली ज्या शिवसेनेला बाहेर काढा अशी राष्ट्रवादीची भूमिका होती, त्याच शिवसेनेला सोबत घेऊन 2019 साली राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली. पण 2014, 2017 अशा प्रत्येकवेळी राष्ट्रवादीने वेगवेगळे निर्णय का घेतले? असं अजित पवार यांना विचारण्यात आलं. यावर बोलताना अजित पवार यांनी थेट कान धरले. आपल्याला माहिती नाही. मी त्याबद्दल काहीच बोलू शकत नाही. शरद पवार यांच्या मनात नेमकं काय येतं हे मी कसं सांगू शकेन, असं अजित पवार म्हणाले.
पवारांची भूमिका काय होती, प्रश्न अनुत्तरीत
दरम्यान, राष्ट्रवादीने 2014 साली भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 2019 साली अजित पवार यांनी पहाटे फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. शरद पवार यांनी मात्र अजित पवार यांचे हे बंड मोडून काढले होते. 2017 सालीदेखील राष्ट्रवादीने भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या काळात कोणाची भूमिका काय होती? शरद पवार यांचे मत काय होते? असे प्रश्न आजही विचारले जातात.
पाहा अजित पवार नेमकं काय म्हणाले?
हेही वाचा :
सोलापूरच्या जागेवर मोठा ट्विस्ट, वंचितच्या उमेदवाराने घेतला अर्ज मागे!