मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या चार जागांवरील निवडणुकीसाठी आता महायुतीमधील तीन पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघात (Konkan graduates constituency) अभिजित पानसे यांची उमेदवारी घोषित करुन भाजपसाठी अगोदरच पाचर मारुन ठेवली आहे. अशात आता अजितदादा गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघावर दावा सांगितला आहे. या जागेवरुन आपण निवडणूक लढवलीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे.
अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची सोमवारी रात्री 8 वाजता मुंबईतील देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. यावेळी छगन भुजबळ यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादी पक्षाने लढावी, अशी भूमिका मांडली. अजित पवार गटाकडून मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. छगन भुजबळ यांनी नलावडे यांच्या बाजूने भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांने निवडणूक लढण्याची आग्रही भूमिका मांडली. येत्या 31 मे पासून शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होईल. त्यामुळे आता अजित पवार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीची खलबतं
विधान परिषदेच्या चार जागांसाठी महायुतीमधील पक्षांमध्ये मंगळवारी चर्चा होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांत चारही जागांवर महायुतीकडून नावांची घोषणा होऊ शकते, अशी माहिती उच्चपदस्थ सुत्रांनी दिली आहे. राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघात आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे विधान परिषदेमध्ये महायुती मनसेला मदत करणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्रीवर बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
राज ठाकरेंच्या खेळीने भाजपची गोची
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी अभिजीत पानसे यांच्या उमेदवाराची घोषणा केली. कोकण पदवीधर हा भाजपचा पारंपारिक मतदारसंघ समजला जातो आणि याच मतदारसंघात निरंजन डावखरे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. मात्र, आता राज ठाकरे यांनी याठिकाणी उमेदवार देऊन पाचर मारुन ठेवली आहे. भाजपसाठी राज ठाकरे अतिश्य महत्त्वाचे असल्याने आता त्यांना निवडणुकीतून माघार घ्यायला कशी सांगायची, हा प्रश्न भाजप नेत्यांपुढे आहे.
आणखी वाचा